Graund Report : डोणगावात निविदा न उघडताच शादीखाना भूमिपूजनाची घाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 03:18 PM2019-09-16T15:18:04+5:302019-09-16T15:19:40+5:30

कार्यरंभ आदेश नसताना निविदा न उघडताही ‘कुदळ’ मारली जात असल्याचा आरोप मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे.

Graund Report : Bhoomipujana rush of marriage hall without opening the tender at Mehkar | Graund Report : डोणगावात निविदा न उघडताच शादीखाना भूमिपूजनाची घाई!

Graund Report : डोणगावात निविदा न उघडताच शादीखाना भूमिपूजनाची घाई!

Next

- राजरत्न सिरसाट 
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघातील विकासाचे तीनतेरा वाजले असून, विधानसभा निवडणुका तोंंडावर आल्यानंतर सभागृह, शादीखाना भूमिपूजनांच्या कामाची घाई करण्यात येत आहे. त्यामध्ये कार्यरंभ आदेश नसताना निविदा न उघडताही ‘कुदळ’ मारली जात असल्याचा आरोप मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे.
मतदारसंघात बेरोजगारी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिला, पुरुष, आबालवृद्धांची भटकंती सुरू आहे. रस्ते, आरोग्य सुविधा, वीजपुरवठा, सिंचन, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित व मोठे असताना त्याकडे दुर्लक्ष होत असून, विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतर मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी सभागृह व शादीखाना बांधण्यावर भर दिला आहे. शादीखाना, समाज मंदिर, सभागृह बांधण्यासाठीही आता कुठे निधी बाहेर काढण्यात येत असल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डोणगाव येथे मोेठी ग्रामपंचायत आहे. १७ सदस्य असलेल्या या गावाची अवस्था अत्यंत बिकट आहे. येथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असून, गावात चालायला रस्तेदेखील सुस्थितीत नाहीत. बाजाराची दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे लक्ष न देता सध्या शादीखाना बांंधण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे निविदा न उघडता आमदारांनी भूमिपूजनाची कुदळ मारल्याचा आरोप होत आहे.
मेहकर शहराला सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. कोराडी धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. म्हणूनच यावर्षी पेनटाकळी धरणातून पूर्ण क्षमतेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव नगर परिषदेने तयार केला आहे. तथापि, नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे असल्याने या कामात आडकाठी आणली जात असल्याचा आरोपही होत आहे. विकास कामासाठी शासनाचा निधी न मिळण्यासाठीचा अडथळा निर्माण केला जात आहे. मेहकर, लोणार शहरातील वसतिगृहाची अवस्था वाईट आहे. बहुजन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असून, याकडे बघण्यासाठी लोकप्रतिनिधींना वेळ नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.
बँक सुशिक्षित बेरोजगारांची कर्ज प्रकरणे मंजूर करीत नाही. अशा स्वरुपाच्या अनेक भीषण समस्या मेहकर विधानसभा मतदारसंघात असताना सभागृह, शादीखाने देऊन नागरिकांना खूश करू न चालणार नसल्याचे मतही अनेकांनी मांंडले.

आमदारांचा वैयक्तिक स्वभाव चांगला आहे; परंतु विकास कामेही होणे गरजेचे आहे. शहराला दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होेतो. बेरोजगारीची समस्या आहे. मोठा उद्योग, प्रकल्प नाही.
-प्रकाशअण्णा लष्कर,
शहर अध्यक्ष भाजपा, मेहकर.

विकास कामाचा निधी मिळू दिला जात नाही. सतत आडकाठी आणली जात आहे. पेनटाकळीतून कोराडी प्रकल्पात पाणी आणून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीची व्यवस्था करायची आहे; परंतु मदत होत नाही.
-कासम गवळी,
नगराध्यक्ष, मेहकर.

डोणगाव येथे शादीखाना बांधण्यात येत आहे. त्यासाठी मागच्या आठवड्यातच आमदारांनी येथे येऊन कुदळ मारू न भूमिपूजन केले; विशेष म्हणजे कामाचा कार्यादेश नसताना निविदा न उघडताच कुदळ मारू न भूमिपूजन करण्यात आले.
-शैलेश सावजी, मेहकर.


मेहकर, लोणार वसतिगृहात मागासवर्गीय बहुजनांची मुले राहून शिक्षण घेतात. तथापि, त्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात आहे. सुुशिक्षित बेरोजगारांची कर्ज प्रकरणे मंजूर केली जात नाहीत. त्यामुळे या वर्गात प्रचंड नाराजी आहे.
-प्रदीप इलक,
जिल्हाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा,बुलडाणा. (विद्यार्थी आघाडी)

प्रशासकीय मान्यता, कामाचा कार्यादेश व निविदा काढूनच शादीखानाचे भूमिपूजन करण्यात आले. पेनटाकळीतून कोराडी प्रकल्पात पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव पाठवून आदेश काढण्याचे काम केले. पालकमंत्र्यांना भेटून मुदत व पुनर्वसनासाठीचाही प्रस्ताव केला. विकास कामे सुरू आहेत. -डॉ. संजय रायमुलकर,
आमदार, विधासभा मतदारसंघ, मेहकर

 

Web Title: Graund Report : Bhoomipujana rush of marriage hall without opening the tender at Mehkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.