महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महानुभाव पंथाचे मोठे योगदान - हर्षवर्धन देशमुख
By संदीप वानखेडे | Published: September 17, 2022 04:51 PM2022-09-17T16:51:15+5:302022-09-17T18:43:16+5:30
संमेलनाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
बुलढाणा - कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या जंजाळात अडकलेल्या सर्वसामान्यांना भक्तीचा सर्वप्रथम अधिकार मिळवून देण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी पुढाकार घेतला़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले़ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे महानुभाव अध्यासन केंद्र आणि जिजामाता महाविद्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या महानुभाव साहित्य संमेलनाचे आयोजन १७ ते १८ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे़ या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते़
संमेलनाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश आवलगावकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य लोणारकर बाबा, पुरुषोत्तम नागपुरे, महंत डॉ़ सोनपेठकर, महंत डॉ. संवत्सरकर, डॉ. संदीप जुनघरे, आदीती अर्बनचे अध्यक्ष सुरेश देवकर, अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमोल ठाकरे आदी उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत कोठे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. संचालन संदीप तडस यांनी केले़.
देशमुख पुढे म्हणाले की, महानुभावांनी केवळ भक्तीच नाही तर मराठी साहित्य निर्मितीचा देखील पाया रचला आहे़ मराठीतील आद्य गद्य व पद्य ग्रंथ निर्माण करणाऱ्या महानुभावांकडे चरित्र, व्याकरण, कथा, भाष्य, महाभाष्य, काव्य, महाकाव्य, आख्याना, टीका, स्थळवर्णने, इतिहास आदींच्यासही आद्यत्वाचा मान जातो. किंबहुना साहित्याला विविधांगीपणे मांडण्याचे काम महानुभावांनी या महाराष्ट्रात सर्वप्रथम केले, हे आपल्याला मान्य करावेच लागेल, असेही ते म्हणाले़.
धकाधकीच्या काळात माणसाला मन:शांतीची गरज
आजच्या धकाधकीच्या काळात मानसाला मन:शांतीची गरज भासत आहे़ अशावेळी अद्वितीय, अजरामर, अक्षर साहित्य वाचले की माणूस मंत्रमुग्ध होतो व गमावलेली मन:शांती परत मिळवितो, एवढी जादू या महानुभाव साहित्यात आहे़ सर्व जीवांचे ऐहिक व पारलौकिक जोपासण्याचे महान सामर्थ्य महानुभाव वाङ्मयात आहे़ महानुभाव वाङ्मयाने मराठी साहित्याचे दालन आपल्या दमदार व सामर्थ्यशाली भाषा वैशिष्ट्यांनी व विविधतेने समृद्ध केले आहे, असेही देशमुख यांनी सांगितले़.