गटशिक्षणाधिकारी, बीडीओ यांना कोंडले कक्षात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 01:24 AM2016-08-30T01:24:25+5:302016-08-30T01:24:25+5:30
संग्रामपूर येथे शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांवर शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करण्यात आले.
संग्रामपूर (जि. बुलडाणा), दि. २९: स्थानिक संग्रामपूर शहरातील जिल्हा परिषद शाळेत गेल्या तीन महिन्यांपासून केवळ १२ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे रिक्त असलेली आठ पदे भरण्यासाठी विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना बीडीओच्या कक्षात कोंडून ठेवले. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद शाळांचे सत्र सुरू झाले आहे; मात्र संग्रामपूर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत वर्ग (तुकड्या) १५ व शिक्षक १२ आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या आठ शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. रिक्त असलेले शिक्षकांचे पद भरण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकार्यांना निवेदनही दिले होते व या निवेदनाद्वारे बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता; मात्र या निवेदनाची शिक्षण विभागाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे अखेर २९ ऑगस्ट रोजी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविले नाही. स्वयंस्फूर्तीने एकही विद्यार्थी शाळेत २९ ऑगस्ट रोजी आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याविनाच शिक्षकांना शाळा भरावी लागली व विद्यार्थीविनाच राष्ट्रगीत झाले, तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता अभयसिंह मारोडे यांनी संग्रामपूर येथील याच जिल्हा परिषदेच्या शाळेत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याच्या मागणीसाठी विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना विस्तार अधिकार्यांच्या कक्षात कोंडून ठेवून आंदोलन केले. यावेळी या आंदोलनात बाबूलाल इंगळे, ऋषीकेश मारोडे, योगेश नेरकर आदी सहभागी झाले होते.