विविध समस्यांचा पालकमंत्री घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:52+5:302021-07-31T04:34:52+5:30
सिंदखेडराजा मतदार संघात सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असून प्रशासन ...
सिंदखेडराजा मतदार संघात सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असून प्रशासन तत्पर असल्यास नागरिकांची कामे गतीने होतात. सध्या पावसाळा असल्याने अनेक प्रासंगिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात अतिवृष्टीमुळे साखर खेर्डा ,दुसरबीड परिसरात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खडकपूर्णा धरणाच्या उजव्या कालव्याचे काम अपूर्ण असल्याने त्याचा फटका राहेरी परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. याबाबत तत्काळ निर्णय होण्याची गरज आहे. शहरासह तालुका व मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांकडून नियोजनबद्ध पद्धतीने व वेळेच्या बंधनात कामे करून घेण्याची गरज आहे़
पांदण व शेत रस्त्यांची समस्या
मतदार संघातील अनेक गावात आजही पांदण किंवा शेत रस्ते नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमधून संघर्ष सर्वश्रुत आहे. लातूर पॅटर्न प्रमाणे या भागातही या समस्येवर उपाय शोधण्याची आवश्यकता आहे.
१३२ केव्ही पॉवर स्टेशन
सिंदखेडराजा शहराची व्याप्ती वाढत आहे. येणाऱ्या पाच वर्षात कृषी समृद्धी नवनगर येथे वसणार आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी नवनगरात दोनशे एकर जमिनीवर फार्मा हब उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशाच प्रकारे अनेक छोटे मोठे उद्योग येथे उभारी घेणार आहेत. या उद्योगांना लागणारा वीज पुरवठा मुबलक आणि नियमित असावा यासाठी शहरात १३२ केव्ही पॉवर स्टेशन उभारण्याची गरज आहे.
कृषी समृद्धी नवनगर
माळ सावरगाव येथे होऊ घातलेल्या कृषी समृद्धी नवनगरचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे़ ग्राऊंड मेंशन रिपोर्ट चुकीचा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अजूनही नवनगरचे काम सुरू झालेले नाही. मुळात सर्वात आधी सिंदखेडराजा नवनगरचे काम होईल अशी ग्वाही रस्ते विकास महामंडळाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली होती़ परंतु गावात कामांना अजून सुरुवातही झालेली नाही़