देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाची पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 02:46 PM2020-01-25T14:46:03+5:302020-01-25T14:46:11+5:30
ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी पाच वर्षांपासून तयार असलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत जाऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी येथील ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयाची झाडाझडती घेत येथे ट्रामा केअर सेंटरची संपूर्ण पाहणी करून ते सुरू करण्याबाबत अत्यावश्यक मशिनरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही होण्याचे संकेत दिले.
सिंदखेडराजा मतदारसंघात दाखल झाल्यानंतर दुपारी चार वाजेच्या दरम्यान ना. शिंगणेंचा ताफा देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात धडकला. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली. वार्डामध्ये भरती असलेल्या महिला रुग्णांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. उपचार व औषधी व्यवस्थित मिळतात का ,याची माहिती रुग्णांकडून घेतली. त्यानंतर ना. शिंगणे यांनी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचे हजेरी रजिष्टर तपासले असता वैद्यकीय अधिक्षक डॉ. आसमा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष शिंगणे, डॉ. वैशाली मांटे हे गैरहजर आढळून आल्याने ना शिंगणे यांनी हजेरी रजिष्टर वर तीनही अधिकाºयांची अनुपस्थिती असल्याचा शेरा लिहून वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष शिंगणे यांची कानउघाडणी केली. यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी पाच वर्षांपासून तयार असलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत जाऊन पाहणी केली. आवश्यक सुविधा उपलब्ध करणार असल्याचे स्पष्ट केले. ट्रामा केअर सेन्टरची डागडुजी व इतर कामे तातडीने करण्यासंदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना निर्देश दिले. यावेळी संतोष खांडेभराड, महेश देशमुख, माजी सभापती रंगनाथ कोल्हे, राजु सिरसाट, विष्णु रामाणे नवनाथ गोमधरे, अतिश कासारे, इस्माईल बागवान, हनिफ शाह, अभिनय आंधळे, अरविंद खांडेभराड हजर होते. (तालुका प्रतिनिधी)