मानसिक आधारासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:14 PM2017-11-24T23:14:13+5:302017-11-25T00:00:45+5:30
शेतकर्यांचे मनोधैर्य वाढावे, आत्मविश्वास वाढावा, यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने ग्रामीण भागात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाद्वारे शेतकर्यांना वैचारिक व मानसिक आधार मिळावा, यासाठी मार्गदर्शन सभा घेण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : शेतकर्यांचे मनोधैर्य वाढावे, आत्मविश्वास वाढावा, यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने ग्रामीण भागात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाद्वारे शेतकर्यांना वैचारिक व मानसिक आधार मिळावा, यासाठी मार्गदर्शन सभा घेण्यात येत आहेत. या उपक्रमाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. कधी अतवृष्टी, कधी गारपीट, तर कधी पिकांवर पडणारे रोग, यामुळे दिवसेंदिवस पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. जे काही थोड्याफार प्रमाणात पिकांचे उत्पन्न होत आहे, त्या पिकांना बाजारात पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. पिकांवर होणारा खर्चही निघत नाही, तर वर्षभर होणारा खर्च, मुलींचे लग्न, सुख-दु:ख यावर होणारा खर्च शेतकर्यांना शेतीच्या उत्पन्नातूनच करावा लागतो. एवढा खर्च शेतीच्या उत्पन्नातून भागत नसल्याने अनेक शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये जनजागृती व्हावी, शेतकर्यांनी अथवा शेतकर्यांच्या मुलांनी शेतीवरच अवलंबून न राहता इतर व्यवसायाकडे वळावे, बाजारामध्ये जे विकते, तेच शेतीत पिकवा, पारंपरिक पिके बाजूला सारून बदलत्या परिस्थितीनुसार पेरणी करा, आत्महत्या करू नका, याबाबत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्यावतीने विलास तेजनकर, अशोक तुपकर, भास्करराव छबिले, प्रा. गजानन जारे, सुभाष म्हस्के, विकास तेजनकर, अतुल शिंदे, गजानन चेके, जे.पी. धांडे आदी पदाधिकारी हे ग्रामीण भागात जाऊन शेतकर्यांच्या सभा घेऊन जनजागृती करीत आहेत. आतापर्यंत चायगाव, वर्दडी, वडगाव माळी, कोयाळी सास्ते, अंत्री देशमुख, साब्रा, सोनाटी, सुकळी आदी गावांमध्ये सभा घेतल्या आहेत.
-