साेनाेशी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:15+5:302021-05-25T04:38:15+5:30

कृषी विभागाच्या वतीने सोनोशी येथे २१ मे रोजी शेतकऱ्यांना सोयाबीन बीज उगवणक्षमता तपासणी, सोयाबीन बीजप्रक्रिया, रुंद सरी वरंबा पद्धतीने ...

Guidance to farmers at Saenashi | साेनाेशी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

साेनाेशी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next

कृषी विभागाच्या वतीने सोनोशी येथे २१ मे रोजी शेतकऱ्यांना सोयाबीन बीज उगवणक्षमता तपासणी, सोयाबीन बीजप्रक्रिया, रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणी, बीज लागवड, ट्रॅक्टर पेरणीयंत्राच्या साहाय्याने करावयाची पेरणी या विषयांवर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिकदेखील करून दाखवण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, रुंद सरी वरंबा पद्धतीचे फायदे समजावून सांगितले.

मधमाशीपालनावर ऑनलाइन प्रशिक्षण

बुलडाणा : जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बुलडाण्याच्या वतीने मधमाशीपालन एक व्यवसाय संधी या विषयावर २० मे रोजी ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रम समन्वयक डॉ. चंद्रकांत जायभाये हे होते.

धा. बढे-वाघजाळ फाटा रस्त्याची दुर्दशा

धामणगाव बढे : विदर्भ, खान्देश तथा मराठवाड्याला जोडणाऱ्या वाघजाळ फाटा ते धामणगाव बढे रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारामुळे अत्यंत दुर्दशा झाली असून, या रस्त्याचा प्रवास वाहनचालकांच्या जिवावर बेतत आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे नियमित अनेक अपघात घडत आहेत.

जिल्ह्यात साकारले २४२ शेततळे

बुलडाणा : शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने शेततळे साकारण्यात येत आहेत. सन २०१९-२० यादरम्यान २४३ शेततळे साकारले आहेत. सिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक १०८ शेततळे साकारली आहेत.

लाेकवर्गणीतून केले शेत रस्त्याचे काम

माेताळा : तालुक्यातील तळणी येथील शेतकऱ्यांनी लाेकवर्गणीतून १ किमी शेत रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी ९० हजार रुपये जमा केले आहेत. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

टरबूज उत्पादक शेतकरी संकटात

सुलतानपूर : गत काही दिवसांपासून प्रशासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. याचा फटका टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातच टरबूज पडून असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.

तळणी येथे धूरफवारणी

माेताळा: तालुक्यातील तळणी येथे काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण गावात धूरफवारणी केली, तसेच ग्रामस्थांनी काेराेनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.

पेट्रोल, डिझेलनंतर खताच्या किमतीतही वाढ

धामणगाव बढे : तालुक्यातील धामणगाव परिसरात पेट्रोल, डिझेलनंतर रासायनिक तसेच शेणखतांच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत शेतपिकांच्या उत्पादनात वाढ न होता घट झाली आहे.

दिव्यांगांची होतेय फरपट

बुलडाणा : जिल्ह्यात जवळपास ६५ हजारांवर दिव्यांगांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी न झालेल्यांची संख्याही मोठी आहे; परंतु आता लॉकडाऊनमुळे दिव्यांगांचे रोजगार गेल्याने त्यांची फरपट होत आहे. अनेकांवर आर्थिक संकट आले आहे.

संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन

दुसरबीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी गावाबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे.

परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी

साखरखेर्डा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी सिंदखेड राजा तालुका विद्यार्थी सेनेने केली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची जागृती

राहेरी बु. : सिंदखेड राजा तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सामाजिक उत्तरदायित्व निभावत धृती फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने सिंदखेड राजा तालुक्यात कोरोना जनजागृती करून व मोफत सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.

Web Title: Guidance to farmers at Saenashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.