सत्ता स्थापनेसाठी ग्रामपंचायत सदस्यांना प्रलोभनांची खैरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:02+5:302021-02-10T04:35:02+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीने सध्या गावागावातील राजकीय वातावरण तापले आहे. आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ...
ग्रामपंचायत निवडणुकीने सध्या गावागावातील राजकीय वातावरण तापले आहे. आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतनिहाय विशेष सभा घेण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. ज्या
ग्रामपंचायतीमध्ये कुण्या एका पॅनलला बहुमत मिळाले, तेथे त्यांच्याकडे आरक्षित संवर्गाचा सदस्य असल्यास सरपंचपदाची निवड सोपी होईल. मात्र, ज्या ठिकाणी कुण्या एका गटाला स्पष्ट बहुमत नाही, तेथे सरपंच आरक्षण असलेल्या संवर्गातील सदस्याला आपल्याकडे खेचण्याचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. सरपंचपदासाठी उमेदवारांची
पळवापळवी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याकरिता सदस्यांना प्रलोभने, आश्वासनांची खैरात वाटली जात आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे काही अपवाद वगळता इतर ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. नुकतीच आरक्षण सोडत पार पडली. यानंतर अनेक गावपुढाऱ्यांनी सत्तास्थापनेसाठी कंबर कसली आहे. आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्ष सरपंच निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे, तसेच सत्तास्थापनेसाठी सदस्यांची पळवापळवी सुरू झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सदस्यांचे तळ्यात-मळ्यात
अनेक ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू असून, काही ग्रामपंचायत सदस्यांचे तळ्यात- मळ्यात सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी अनेक सदस्यांना हेरून भूलथापा देण्यात येत असल्याने त्यांना पर्यटनस्थळी पाठवून सुरक्षित ठेवण्यात आले आहे.