गुरूजी तुम्ही पण...जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:25 AM2021-06-05T04:25:25+5:302021-06-05T04:25:25+5:30
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रात्री उशिरा दाखल केलेल्या या कारवाईने जुगाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरालगत असलेल्या कुंभारी शिवारात ...
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रात्री उशिरा दाखल केलेल्या या कारवाईने जुगाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरालगत असलेल्या कुंभारी शिवारात एक्का बादशाह नावाचा जुगार सुरू असून प्रतिष्ठित नागरिक जुगार खेळत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर एसडीपीओ सोनवणे यांनी आपल्या पथकासह दुपारपासून डोईफोडे वाडी परिसरात सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत जालना जिल्ह्यातील दोन शिक्षकांसह दहा जुगाऱ्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून रोख २२ हजार ४०० रुपये, पाच दुचाकी किंमत दोन लाख असा एकूण २ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भगवान सर्जेराव डोईफोडे, देवानंद सुखदेव डोईफोडे, रवींद्र कुंडलिक वाघ, गणेश भवानी माळी (सर्व रा. डोईफोडे वाडी), रामेश्वर नारायण वाघमारे (रा. देऊळगाव राजा), राहुल गणेश मोटे, प्रदीप एकनाथ विघे, रामेश्वर नामदेव झोरे, ब्रिजेश विष्णू कपाटे, आशिष बद्रीनारायण गुजर (सर्व रा. देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ
पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला असून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सुरु असलेल्या जुगारावर छापा टाकून दोन शिक्षकांसह दहा जुगाऱ्यांना जेरबंद केल्याने परिसरात चोरी चोरी जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश डोईफोडे, विलास इंगळे, राजू नागरे, पोलीस कॉन्स्टेबल बलराम जारवाल यांनी सहभाग घेतला.