मध्यप्रदेशातून गुटख्याची विदर्भात एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 11:08 AM2021-06-21T11:08:31+5:302021-06-21T11:08:40+5:30

Gutkha entry from Madhya Pradesh to Vidarbha : खामगाव औद्योगिक वसाहतीत कोट्यवधी रुपयांची गुटख्याची साठेबाजी करण्याची हिंमत काही माफियांनी केलेली आहे.  

Gutkha entry from Madhya Pradesh to Vidarbha | मध्यप्रदेशातून गुटख्याची विदर्भात एंट्री

मध्यप्रदेशातून गुटख्याची विदर्भात एंट्री

Next

- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मध्य प्रदेशातून विदर्भातील अकोला जिल्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्हाणपूर येथून जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पहूरमार्गे मालवाहू वाहनांतून राजरोसपणे आणला जातो. त्यासाठी ७ क्विंटल क्षमतेच्या वाहनापोटी दरमहा  ६० हजार रुपये विविध ठाण्यांतील पोलिसांवर खर्च होत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच खामगाव औद्योगिक वसाहतीत कोट्यवधी रुपयांची गुटख्याची साठेबाजी करण्याची हिंमत काही माफियांनी केलेली आहे.  
राज्यात गुटखा प्रतिबंधित आहे. मात्र, विदर्भात ग्रामीण भागात हा गुटखा सहजपणे उपलब्ध आहे आणि अव्वाच्या सव्वा दराने त्याची विक्री होत आहे. गुटख्याची किंमत वाढण्यामागे वाहतूक खर्च अधिक असल्याचे कारण आहे. बऱ्हाणपूर येथे गुटखा माफियांचे मुख्य केंद्र आहे. तेथून जामनेर तालुक्यात गुटखा रात्रीच्या अंधारात आणला जातो व तेथून त्याच तालुक्यातील पहूरला पोहोचतो. खामगाव तसेच अकोला येथे तो आणण्यासाठी छोट्या वाहनांचा वापर  होतो. त्यात खाद्यपदार्थांची हलकी पाकिटे कोंबली जातात. त्याखाली गुटख्याची पोती दडवून गुटखा पोहोचवला जातो. काही गुटखा माफिया वाहनचालक पोलिसांची नजर चुकवण्यासाठी दिवसाढवळ्या वाहतूक केली जाते.


मलकापूर, नांदुरा, बोराखेडी, पिंपळगाव हद्दीतून वाहतूक
विशेष म्हणजे, गुटखा खामगाव, अकोल्यात पोहोचवण्यासाठी मलकापूर, बोराखेडी, नांदुरा, पिंपळगावराजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहतूक केली जाते. खामगाव वगळता कुठेही कारवाई होत नसल्याने गुटखा माफियांचा छोट्या गाडीमागे होत असलेला ६० हजार रुपये मासिक खर्च ‘सत्कारणी’ लागत आहे.


अकोल्यात खडकी पुलाजवळ साठा
खामगाव शहरातील बर्डे प्लाॅट, औद्योगिक वसाहतीतील गोदामात गुटख्याचा सर्रास व्यापार केला जातो. तर खामगावातीलच काहींनी थेट अकोल्याशी संधान साधले आहे. खाद्यपदार्थांच्या पाकिटासह गुटखा दररोज सकाळी अकोल्यात पोहोचतो. मंगरूळपीर मार्गावर राष्ट्रीय महामार्गाच्या खडकी अंडरपासजवळ असलेल्या गोदामात गुटखा उतरवला जातो. जैन नामक व्यक्तीचे हे गोदाम आहे. तेथून सकाळी ११ वाजेपर्यंत गुटखा अकोला शहरातील पान टपऱ्या, किराणा दुकानांत पोहोचतो. 

Web Title: Gutkha entry from Madhya Pradesh to Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.