चिखली, सिंदखेडराजात २.४० लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:23 PM2020-01-25T13:23:54+5:302020-01-25T13:24:02+5:30
चिखली येथे दोन ठिकाणी छापा मारून छुप्या पद्धतीने विक्री होत असलेल्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अमरावती येथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या एका चमुने चिखली येथे दोन ठिकाणी छापा मारून छुप्या पद्धतीने विक्री होत असलेल्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे. एक लाख २४ हजार ७२० रुपये किंमतीचा हा गुटख्याचा साठा आहे. दरम्यान, सिंदखेड राजा येथेही एक लाख १६ हजार रुपयांचा असा एकूण दोन लाख ४० हजार ७७० रुपयांचा हा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
चिखलीतील बाबुलाल चौकातील मे. के. जी. एन. पान मटेरीलय आणि पंकज जोशी यांच्या राहते घर येथे हा छापा टाकण्यात येऊन हा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यात मे. के. जी. एन. पान मटेरीयल यांच्याकडून ९४ हजार ९५० आणि पंकज जोशी यांच्याकडून २९ हजार ७७७ रुपयांचा असा एकूण एक लाख २४ हजार ७२० रुपयांचा गुटखा आढळून आला. हा साठा अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी पुढील कार्यवही करीता जप्त केला. दरम्यान, प्रयोग शाळेत पडताळणीसाठी त्याचे नमुने घेण्यात आले असून नमुन्यांच्या विश्लेषणानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
या कारवाईत अमरावती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त एस. जी. अन्नापुरे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल राठोड, अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, गोपाल माहोरे, संदीप सुर्यवंशी यांनी सहभाग सहभाग घेतला होता.सिंदखेड राजातही सव्वा लाखांचा गुटखा जप्त
४सिंदखेड राजा: शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने गुटखा विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदखेड राजा आणि शिवणी टाका येथे छापा टाकून एक लाख १६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत सिंदखेड राजा येथील शेख हातीम रियाजोद्दीन आणि शिवणी टाका येथील मयुर अभिमान देशमुख या दोन गुटखा विक्रेत्यांच्या घरातून हा गुटखा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. सध्या हा जप्त केलेला गुटखा सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने अन्न व औषध प्रशासनास अनुषंगीक पत्र पाठविण्यात आले असून त्यांच्याकडून गुटख्याची तपासणी केल्यानंतर संबंधीत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक ठाणेदार शैलेश पवारयांनी दिली.
मंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई
अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा येथील नागरी सत्कार कार्यक्रमात बुलडाणा जिल्हा हा गुटखा मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तसा राज्यात गुटखा बंदीसंदर्भातील अध्यादेश २०१२ मध्येच काढण्यात आलेला असल्याचे स्पष्ट करत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनास तसे निर्देश दिले होते. त्यासंदर्भाने आता अनुषंगीक कारवाई होत आहे.