गोल्ड फिंगरच्या कारखान्यात चक्क गुटख्याचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:27 AM2020-08-19T11:27:45+5:302020-08-19T11:27:56+5:30
संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने एमआयडीसीत गत काही दिवसांपासून अवैध धंदे वाढीस लागल्याचे चित्र आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: राज्यात गुटखा विक्री, साठा, वाहतूक, वितरण आणि उत्पादन करण्यावर प्रतिबंध आहे. मात्र, तरीही खामगाव एमआयडीसीतील एका पोंगा पंडित (गोल्ड फिंगर) आणि फ्रायम निर्मिती कारखान्यात गुटखा साठा लपविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसीतील बंद आणि सुरू असलेले उद्योग अवैध व्यवसायाचे अड्डे बनल्याचे दिसून येते. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने एमआयडीसीत गत काही दिवसांपासून अवैध धंदे वाढीस लागल्याचे चित्र आहे.
खामगाव येथील एमआयडीसीतील एका पोंगा पंडित (गोल्ड फिंगर), कुरकुरे, फ्रायम, बटाटा आणि केला चिप्स निर्मितीचा कारखाना भाडेपट्ट्याने घेण्यात आला. पोंगा पंडित निर्मितीसाठी परवानगी असलेल्या या कारखान्यात मुळ उद्देशाला हरताळ फासत गुटख्याचा साठा करण्यात आला.
या गुटखा साठ्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली.
वडिल हमाल आणि भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका मजुराने ३६ लाखांचा गुटखा खरेदी, वाहतूक आणि साठा केलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नि:पक्ष चौकशी आणि कारवाई झाल्यास अनेक बडे मासे गळाला लागू शकतात.
‘नाराजी पिटीशन’वर आज सुनावनी!
प्रतिबंधीत गुटखा साठा प्रकरणी खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल ‘नाराजी पिटीशन’वर उद्या बुधवार १९ आॅगस्ट रोजी सुनावनी होणार आहे. अटकेतील आरोपी राजू गव्हांदे यास जामीन नाकारण्यात यावा, यासाठी त्याला न्यायालयात जामीन नाकारण्याचा अर्ज (नाराजी पिटीशन) अॅड. एस. डब्ल्यू. शेगोकार यांच्यामार्फत दाखल केले आहे.