ज्ञानगंगा अभयारण्य विस्ताराच्या हालचाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 12:12 PM2021-02-14T12:12:31+5:302021-02-14T12:12:37+5:30
Gyanganga Sanctuary जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्र हे ज्ञानगंगा अभयारण्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून बुलडाणा शहरालगत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावलेल्या टी-१ सी-१ वाघामुळे बुलडाणा जिल्ह्यातील टायगर कॅरिडॉरला चालना मिळाली असून, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूच्या सूचनेनुसार या अभयारण्याचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहे. त्यानुषंगाने प्रादेशिक वन विभागांतर्गतचे जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्र हे ज्ञानगंगा अभयारण्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अद्याप त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले नसले, तरी तसे सर्वेक्षणही वन्यजीव विभागाने केले असल्याची माहिती वन्यजीव विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. या आधीच ज्ञानगंगात स्थिरावलेल्या टी-१ सी-१ वाघाच्या मेटिंगसाठी अभयारण्यात वाघिणी सोडण्याच्या दृ्ष्टीने वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अनुमती दर्शवली आहे. तसा अहवालही त्यांनी पाठविला आहे. यासोबतच ज्ञानगंगा अभयारण्यात प्रती चौरस किमी १८.२३ तृणभक्षी प्राणी असल्याने वाघांसाठीचे खाद्य येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी वाघांच्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्य उपयुक्त आहे हे स्पष्ट झाले आहे.
मात्र, २० वाघांच्या रहिवासासाठी ८०० ते १०० चौ. किमी क्षेत्र आवश्यक असते. भविष्यात येथे वाघांची संख्या वाढल्यास त्यांच्यासाठी टायगर कॉरिडॉर असावा त्या दृष्टीनेही काटेपूर्णा, अंबाबरवा आणि जळगाव खान्देशमधील भवानी अभयारण्याचा विचारही करण्यात येत आहे. आता ‘ज्ञानगंगा’च्या विस्ताराच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. बुलडाणा, मोताळा आणि खामगाव तालुक्यांतील प्रादेशिक वनविभागांतर्गत येणारा भाग हा ज्ञानगंगा अभयारण्यात समाविष्ट केला जाऊ शकतो.
व्याघ्र संवर्धन समितीच्या बैठकीची गरज
गेल्यावर्षी कोरोना संसर्गाच्या काळात दोन वेळा व्याघ्र संवर्धन समितीची बैठक झाली होती. आता कोरोनाचा प्रकोप काही प्रमाणात मर्यादित झाला आहे. लसीकरणही सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एम. एस. रेड्डी अध्यक्ष असलेल्या या व्याघ्र अधिवास समितीची आता नव्याने एक बैठक होण्याची गरज आहे. या समितीमध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियो डॉ. बिलाल हबीब, अकोला वन्यजीव विभागीय अधिकारी एम. एन. खैरनार व अन्य काही सदस्यांचा समावेश आहे.