गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:41 AM2021-09-14T04:41:02+5:302021-09-14T04:41:02+5:30
संदीप वानखडे बुलडाणा : जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटमुळे रबी पिकांसह फळबागांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. ...
संदीप वानखडे
बुलडाणा : जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटमुळे रबी पिकांसह फळबागांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले हाेते. पाच तालुक्यांतील २८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २२ काेटी ७३ लाख ४३ हजार रुपयांची मदत आठवडाभरात जमा हाेणार आहे़
जिल्ह्यात सन २०२१ च्या सुरुवातीलाच गारपीटमुळे रबी पिके आणि फळबागांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे पाठवण्यात आले हाेते. नुकसानग्रस्तांना मदत देण्याची तयारी शासनाच्या वतीने करण्यात आली हाेती. गारपिटीचा तडाखा पाच तालुक्यांना बसला हाेता. यामध्ये लाेणार, देउळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली आणि मेहकर तालुक्यांचा समावेश आहे. या पाचही तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. यापैकी २८ हजार शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात २२ काेटी ७३ लाख ४३ हजार रुपये जिल्हा स्तरावरून त्या त्या तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले आहेत. तसेच तहसील स्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून आठवडभरात ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे़
देऊळगाव राजा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीचा सर्वाधिक तडाखा देऊळगाव राजा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील २२ हजार १८० शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात १७ काेटी ७५ लाख ४२ हजार रुपये लवकरच जमा कण्यात येणार असल्याची माहिती देऊळगाव राजाच्या तहसीलदार सारिका भगत यांनी दिली, तसेच लाेणार तालुक्यातील २६७७ शेतकऱ्यांना १ काेटी ९८ लाख, सिंदखेड राजा तालुक्यातील ३९२३ शेतकऱ्यांना ३ काेटी २ लाख ५० हजार, चिखली तालुक्यातील ५ शेतकऱ्यांना ४० हजार तर मेहकरातील एकमेव शेतकऱ्यास १६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
असे आहेत लाभार्थी शेतकरी
देऊळगाव राजा
२२१८०
सिंदखेड राजा
३९२३
लाेणार
२६७७
चिखली
०५
मेहकर
०१