घोषणांचे ढग नको, मदतीचा पाऊस द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी
By संदीप वानखेडे | Published: December 3, 2023 04:50 PM2023-12-03T16:50:00+5:302023-12-03T17:02:38+5:30
पालकमंत्री वळसे पाटील यांनी केली पाहणी
संदीप वानखडे, देऊळगाव राजा (बुलढाणा): गेल्या रविवारी मध्यरात्री गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका संपूर्ण तालुक्याला बसला. परंतु, सर्वाधिक गारपीट तुळजापूर महसूल मंडळात झाल्यामुळे या मंडळातील १३ गावांमधील शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले. असे असताना आठ दिवस उलटूनही फक्त पंचनामेच सुरू असून मदतीची अपेक्षा असताना आलेल्या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत आश्वासना पलीकडे दुसरे काही केले नाही. आम्हाला तातडीची मदत द्या, अशी मागणी ३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात प्रत्यक्ष बांधावर जाऊन अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तालुक्यातील तुळजापूर, गोळेगाव, गिरोली तसेच असोला जहांगीर येथे थेट पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या. यामध्ये शासनाची एक रुपयात पिकविमा ही योजना फसवी ठरली असून ॲग्रीकल्चर विमा कंपनीने तक्रारीसाठी असलेली साइट काही तासच सुरू ठेवून नंतर बंद केली. त्यामुळे केवळ पाच टक्के विमाधारक शेतकऱ्यांना तक्रार नोंदवता आली.
यानंतर तक्रार नोंदवली, त्यांना विमा भेटणार की नाही असा संभ्रम असल्याने शेतकऱ्यांची घालमेल पहावयास मिळाली. नेट शेड धारक शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. कारण याला कोणतेही विमा संरक्षण नाही. सीड उत्पादक कंपनीने हात वर केले. त्यामुळे या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आम्हाला मदत द्या, अशी मागणी पालकमंत्र्याकडे शेतकऱ्यांनी केली. त्यावर त्यांनी शासन दरबारी आम्ही तुमच्या मागण्या मांडू या पलीकडे काहीही सांगितले नाही. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी मदतीचे मदतीचे आश्वासन न देता तशा प्रकारचे आदेश प्रशासनाला द्यावे, अशी मागणी केली.
यावेळी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामप्रसाद शेळके, जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, तहसीलदार श्याम धनमणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उद्धव मस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, गटविकास अधिकारी मुकेश माहोर, राजीव शिरसाट, गजानन पवार, रंगनाथ कोल्हे, गोपीचंद कोल्हे, गणेश तिडके, लिंबाजी तिडके यांच्यासह नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.