चिखली तालुक्यात गारपिटीने ६0 गावांतील पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:06 AM2018-02-12T01:06:52+5:302018-02-12T01:07:11+5:30

वादळी वारा आणि तुफान गारपिटीसह आलेल्या पावसामुळे तालुक्यातील रब्बी पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांना मोठय़ा प्रमाणावर बाधा पोहचून अतोनात नुकसान झाले आहे. या गारपिटीचा तालुक्यातील ६0 गावांना तीव्र तडाखा बसला असून, तालुक्यातील सुमारे १४ हजार हजार १२५ हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली आहे.

Hailstorm in Chikhli taluka caused severe damage to crops in 60 villages | चिखली तालुक्यात गारपिटीने ६0 गावांतील पिकांचे अतोनात नुकसान

चिखली तालुक्यात गारपिटीने ६0 गावांतील पिकांचे अतोनात नुकसान

Next
ठळक मुद्दे१४ हजार १२५ हेक्टरवरील पिकांची हानी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : अस्मानी  आणि सुलतानी संकटांचा सातत्याने सामना करणार्‍या शेतकर्‍यांपुढे संकटाची एकापाठोपाठ एक मालिकाच जणू नियतीने लावली आहे. या मालिकेतीलच अस्मानी संकट घेऊन उजाडलेली ११ फेब्रुवारीची पहाट शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेणारी ठरली असून, वादळी वारा आणि तुफान गारपिटीसह आलेल्या पावसामुळे तालुक्यातील रब्बी पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांना मोठय़ा प्रमाणावर बाधा पोहचून अतोनात नुकसान झाले आहे. या गारपिटीचा तालुक्यातील ६0 गावांना तीव्र तडाखा बसला असून, चिखली तालुक्यातील सुमारे १४ हजार हजार १२५ हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली आहे.
चिखली शहर व तालुक्यात सर्वत्र ११ फेब्रुवारी रोजी पहाटे सोसाट्याचा वार्‍यासह झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरासह तालुक्यातील ६0 गावांत बोरा एवढय़ा गारा पडल्याने शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, मका, हरभरा ही पिके आडवी पडली आहेत. तर अत्यंत नाजूक समजल्या जाणारे व तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर घेतले जाणारे कांदा बियाणे पिकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. याशिवाय द्राक्ष, डाळिंब व आंबा या फळबागांना मोठी हानी पोहचली आहे. तालुक्यातील काही भागात आंब्याला मोहर फुटलेला होता तर काही भागात बारीक कैर्‍यादेखील लागल्या होत्या. मात्र, आज सकाळच्या या तीव्र गारपिटीत मोहरलेल्या आंब्याची फुले व कैर्‍यांचा सडा पडलेला दिसून आला. हीच परिस्थिती द्राक्ष व डाळिंब बागांची असून, द्राक्ष बागांतील द्राक्षांचे घड तुटून पडले तर द्राक्ष वेलांनाही मोठी हानी पोहचली आहे. याशिवाय टरबूज, खरबूज, पपई, पेरू, संत्रा, पानतांड्यांनाही मोठी हानी पोहचली असून, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.  गहू व हरभरा काढणीला आला असताना गारपिटीने ही पिके आडवी पडली असल्याने रब्बी हंगामावर अवलंबून असलेले शेतकरी कोलमडला आहे. तर गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही हातातोंडाशी आलेला घास या पावसाने व गारपिटीने हिरावून नेल्याने शेतकरी पार हादरून गेला आहे. दरम्यान, या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा महसूल विभागाच्या प्राथमिक पाहणी अहवालानुसार चिखली, हातणी, धोडप, कोलारा, शेळगाव आटोळ, चांधई, एकलारा व पेठ या महसूल मंडळातील गावांना बसली असून, या दोन महसूल मंडळात गावांना तीव्र फटका बसला. गहू २ हजार ८५२ हेक्टर, हरभरा ९ हजार ८८८.५ हे., फळबागा २५९.४ हे., भाजीपाला पिके २४८ हे., व इतर ७२६ हेक्टर असे एकूण १४ हजार १२५ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आजच्या गारपिटीने तालुक्यातील सवणा, शेलूद, सोमठाणा, दिवठाणा, बेलदरी, गिरोला, चिखली, वळती, पळसखेड जयंती, पेठ, बोरगाव वसू, शिंदी हराळी, धोत्रा भनगोजी, उदात्रा, शेलोडी, चांधई, पळसखेड दौलत, गोद्री, येवता, बोरगाव काकडे, आन्वी, मुंगसरी, शेलगाव जहा., अमोना, कोनड, इसरूळ, मंगरूळ, अंचरवाडी, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, पिंपळवाडी, देऊळगाव घुबे, भालगाव, गांगलगाव, धोडप, चांधई, कारखेड, डोंगरशेवली, पळसखेड सपकाळ, बेलखेड आदी ६0 गावातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 
पहाटे गारपीट झाल्यानंतर आमदार राहुल बोंद्रे व प्रशासनाच्यावतीने तहसीलदार मनीषकुमार गायकवाड व अधिकारी वर्गाने तातडीने तालुक्यात नुकसानाची पाहणी केली असून, तहसीलदारांनी तातडीने नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबधितांना दिले आहे. 

एकरी २५ हजार नुकसान भरपाई द्या - राहुल बोंद्रे
तालुक्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीची पाहणी आमदार राहुल बोंद्रे यांनी तहसीलदार मनीष गायकवाड व महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांसमवेत केली. तालुक्यातील विविध गावातील पिकांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर झालेल्या प्रचंड नुकसानातून शेतकरी सावरणे गरजेचे असल्याने शासनाने तातडीने संबंधित विभागाला आदेश देऊन झालेल्या नुकसानाची मोजणी करावी व शेतकर्‍यांना एकरी किमान २५ हजार रुपयांची तर फळ पीक व इतर पिकांना आवश्यक त्या प्रमाणात मदत तातडीने द्यावी, अशी मागणी केली आहे.

नुकसान भरपाई देण्याची रयत क्रांती संघटनेची मागणी
वादळी वार्‍यासह गारपीट व पावसामुळे गहू, हरभरा, यासह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याने या नुकसानाचा तातडीने पंचनामा करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी केली आहे.

जास्तीत जास्त नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार - श्‍वेता महाले 
चिखली तालुक्यात वादळी वार्‍यासह गारिपटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून जि.प. सभापती श्‍वेता महाले यांनी शेतकर्‍यांना धीर देत तालुक्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे सांगितले.

Web Title: Hailstorm in Chikhli taluka caused severe damage to crops in 60 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Chikhliचिखली