बुलडाणा जिल्ह्यातील निम्मे लघू प्रकल्प कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 05:37 PM2019-03-06T17:37:13+5:302019-03-06T17:37:23+5:30
बुलडाणा: भूजल पातळीत दीड मीटरने घट झालेली असतांनाच जिल्ह्यातील ८१ पैकी तब्बल ४० लघू प्रकल्प कोरडे पडले आहे.
बुलडाणा: भूजल पातळीत दीड मीटरने घट झालेली असतांनाच जिल्ह्यातील ८१ पैकी तब्बल ४० लघू प्रकल्प कोरडे पडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठाही प्रभावीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सप्टेंबर-आॅक्टोबर २०१८ दरम्यानच जिल्ह्यातील जवलपास २९ लघू प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील जवळपास ३७ पाणीपुरवठा योजनाना फटका बसला होता. त्यानंतर आता उन्हाची दाहकता जसजशी वाढत आहे तस तसा लघु प्रकल्पातील जलसाठाही झपाट्याने घटत आहे. त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर पडत आहे. जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू प्रकल्प मिळून ९१ प्रकल्प आहेत. यापैकी दहा प्रकल्प हे मोठ व मध्यम स्वरुपाचे असून या प्रकल्पांमध्येही अवघा १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा हे तीन प्रकल्प जिल्ह्यात मोठे असून पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी आणि कोराडी कोल्हापुरी बंधारा हे तुलनेने मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पातील जलसाठाही हा अवघा १३ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकल्पांचीही अवस्था बिकट होण्याची भीती आहे. लघू प्रकल्पांचा विचार करता स्थिती अधिकच बिकट बनत चालली असल्याचे चित्र आहे. लघू प्रकल्पापैकी अवघ्या २४ प्रकल्पामध्येत दुहेरी टक्केवारीत पाणीसाठा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. वार्षिक सरासरी प्रकल्पातील ३० टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत असते. उन्हाळ््यात हा वेग कमाल मर्यादेपर्यंत जात असल्याने ८१ लघू प्रकल्पामध्ये असलेला ५.७० टक्के जलसाठाही झपाट्याने घटण्याची भीती आहे. त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर होणार असून गावातील विहीरींच्या पाणीपातळीतही त्यामुळे प्रसंगी मोठी घट होण्याची भीती आहे. परिणामस्वरुप विहीर अधिग्रहणाचीही प्रसंगी समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे पाणीटंचाई असतानाच टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांसाठी निधीचीही उपलब्धत अपेक्षीत अशी नाही. त्यामुळे येत्या काळात टंचाईचे सावट अधिकच गडद होण्याची साधार भीती आहे.