चिखली शहरातील महिलांच्या रोजगारावर गदा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:23+5:302021-07-10T04:24:23+5:30
चिखली : तालुक्यातील बोरगाव वसू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत काम करणाऱ्या बाहेरगावातील महिलांना काढून स्थानिकांना काम देण्यात यावे, ...
चिखली : तालुक्यातील बोरगाव वसू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत काम करणाऱ्या बाहेरगावातील महिलांना काढून स्थानिकांना काम देण्यात यावे, अशी मागणी गावातील महिलांनी केली हाेती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या चिखली शहरातील अनेक महिलांच्या रोजगारावर गदा आली आहे. यामध्ये अनेक विधवा व परित्यक्ता महिलांचा समावेश असल्याने नर्सरीत मजुरीसाठी कायम ठेवावे, अशी विनंती या महिलांनी केली आहे.
तालुक्यातील बोरगाव वसु येथील नर्सरीत शहरातील सुमारे २० महिला गेल्या अनेक वर्षांपासून मजुरीचे काम करीत आहेत. मात्र, या नर्सरी संबंधाने स्थानिक महिलांनी एका तक्रारीत बाहेरगावातील महिलांना काढून गावातील महिलांना रोजगार देण्याची मागणी केल्याने शहरातील महिलांच्या रोजगारावर गदा आली आहे. या पृष्ठभूमीवर शहरातील महिलांनी तहसीलदारांना विनंती अर्ज सादर केला आहे. यामध्ये आम्हीदेखील मागासवर्गीय, ओबीसी व बहुजन समाजातील भूमिहीन, विधवा व परित्यक्ता महिला असून, गेल्या अनेक वर्षांपासून नर्सरीतील रोजगारावरच उदरनिर्वाह चालवित आहोत. त्यातच सध्या पावसाचे दिवस असल्याने इतरत्र कुठेही रोजगार उपलब्ध होत नाही, अशा स्थितीत आमचा रोजगार हिरावल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याने याबाबत उचित निर्णय घेऊन न्याय द्यावा व आमचा रोजगार कायम ठेवण्यात यावा, अशी विनंती मीनाबाई पवार, शहेनाजबी हाशमखॉ, कोळीका, यंगड, सविता वानखेडे, सीमा आंभोरे, कल्पना नवघरे, मीरा सुरडकर, मीना पवार, फैमीदाबी सिंकदर, मंदा इंगळे, लता इंगळे, चंद्रभागा टकले या महिलांनी केली आहे.