प्रतीक्षाच्या मदतीसाठी सरसावले हात!
By admin | Published: July 20, 2014 01:20 AM2014-07-20T01:20:40+5:302014-07-20T02:02:56+5:30
लोकमतचा खामगाव येथील उपक्रम : सामाजिक संघटनांची मदत.
खामगाव: तालुक्यातील अंत्रज येथील प्रतीक्षा कळसकार या किडनीग्रस्त मुलीच्या आजारासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च होत आहे. यासंदर्भात ह्यकिडनी निकामी झालेल्या मुलीला मदतीची प्रतीक्षाह्ण यामथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच विविध सामाजिक संघटनांसह काही समाजसेवकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
शेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जितु सलामपुरीया यांनी प्रतीक्षाच्या नावे एक हजार एक रुपयांचा चेक लोकमतच्या शेगाव कार्यालयात धनादेश दिला. त्याचप्रमाणे रेखा प्लॉट मधील मॉ वैष्णवी बहुउद्देशिय संस्थेच्या नवयुवकांनी मदत फेरी काढून पाच हजार २0१ रूपयांची रक्कम गोळा केली. या मदत फेरीत अनेकांचा हातभार लागला. अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:हून मदत दिली. सदर रक्कम प्रतीक्षाच्या उपस्थितीत तिचे वडील संतोष कळसकार यांच्याकडे आज लोकमत कार्यालयात सुपूर्द करण्यात आली. यावेळी मंडळाचे सचिव अजय ताकवाले, विनोद राठोड, विनय परदेशी, शिवा घोगरे, गणेश पिंपळकार, सूरज विभुते, राहूल अहीर, सुनील श्रीवास्तव आदी उपस्थित होते. या शिवाय आमदार दिलीपकुमार यांनी राजीव गांधी योजनेतून प्रतिक्षाला सर्वातोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे हतबल होवून आपण प्रतीक्षावरील उपचार थांबविले होते. लोकमतच्या मदतीचा हात उपक्रमामुळे आपल्या मुलीवरील उपचार पुन्हा सुरू करण्यास मदत झाली. याबाबत लोकमतचा मी सदैव ऋणी राहील, असे प्रतीक्षाचे वडील संतोष कळसकार यांनी सांगीतले.