हनुमान मंदिरात पार पडला ईद मिलनाचा कार्यक्रम!
By admin | Published: July 11, 2017 07:25 PM2017-07-11T19:25:27+5:302017-07-11T19:25:27+5:30
बंधुभाव कायम ठेवण्यासाठी नागरिकांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : ""कभी तुम हम को अजमाकर तो देखो, अपने गले से लगाकर तो देखो, कब तक लडते रहेंगे धर्मो के नाम पर, कभी तुम मस्जीद में आओ, कभी हम को मंदिर मे बुलाकर तो देखो"" याचा प्रत्यय नुकताच धामणगाववासियांना आला. सामाजिक सलोखा कायम ठेवण्याकरिता येथील हनुमान मंदिरात ईद साजरी करण्यात आली.
धामणगाव येथील सामाजिक सलोखा हा इतरांना आदर्श ठरावा असा आहे. दरवर्षी येथील हनुमान मंदिरात ईद साजरी करण्यात येते. हिंदु-मुस्लिम एैक्य फक्त नावापुरतेच न ठेवता येथील समाज जिवनाचा तो भाग आहे. याचा उल्लेख करीत येथील सामाजिक ऐक्य हे प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉ.सय्यद साजिद (राहुरी) यांनी केले. त्यामुळे सर्वत्र जातीयतेचे बीज रोवले जात असताना धा.बढे मात्र त्यापासून अलिप्त आहे, असे यावेळी ठाणेदार दीपक वळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. सर्वत्र सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी डॉ.सैय्यद साजिद झटत असतात. याचा उल्लेख करीत देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित राहणे काळाची गरज असल्याचे यावेळी ग्रा.पं.सदस्य किशोर मोरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जामा मस्जिदचे ईमाम मौलाना हनीफ यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते. एस.आय.ओ. शाखेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.