'हॅपी बर्थडे टू यू...' पण कुणाला? ऐकून नवल वाटेल; वृक्षसंवर्धनाचा अनोखा उपक्रम
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 7, 2023 05:39 PM2023-09-07T17:39:14+5:302023-09-07T17:39:30+5:30
डोणगावात केला अडीचशे वृक्षांचा वाढदिवस साजरा
डोणगाव : 'हॅपी बर्थडे टू यू...' हे शब्द वाचल्यानंतर कुठे तरी कुण्या व्यक्तीचा, मुलाचा वाढदिवस असेल, असे प्रत्येकाला वाटते. परंतू येथे चक्क अडीचशे वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुणालाही नवल वाटेल, असा हा वृक्ष संवर्धनाचा उपक्रम ओलांडेश्वर वृक्ष संवर्धन समितीसह डोणगाव येथील ग्रामस्थांनी ७ सप्टेंबरला राबविला.
ओलांडेश्वर वृक्ष संवर्धन समितीने गावकऱ्यांच्या सर्वांच्या योगदानातून व सहकार्याने मागील एक वर्षात समितीच्या सदस्यांनी अविरत दररोज सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत प्रत्यक्ष श्रमदान करून एका वर्षामध्ये २५० वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करीत आहे. समितीची स्थापना मागील वर्षी ७ सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्या दिवशी वृक्ष लावगड करण्यास सुरवात करण्यात आली. त्या वृक्षांना ७ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे लावलेल्या वृक्षाचा वाढदिवस आपल्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करायचा ठरले.
डोणगाव येथील सर्व नागरिक, वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी, समितीचे दाते, डॉक्टर, व्यापारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, कर्मचाऱ्यांना वृक्षाच्या पहिल्या वाढदिवस डोणगांव येथील गणेश मंदिर जवळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक झाडाला सुशोभित करण्यात आले होते. प्रत्येक वृक्षाला फुलाचा हार घालून प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाची शपथ घेत वृक्षांच्या या आगळावेगळा वाढदिवस कार्यक्रमात सहभाग घेतला.