मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ, सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
By अनिल गवई | Published: June 23, 2023 05:24 PM2023-06-23T17:24:07+5:302023-06-23T17:25:16+5:30
विवाहितेच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीसांनी पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव: मुलगी झाल्याने गुन्हेगारी प्रवृतीच्या पतीसह सासरच्या मंडळीने एका विवाहितेचा असह्य शारिरीक व मानसिक छळ केला. ही घटना खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीसांनी पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे माहेर असलेल्या माधुरी गणेश महल्ले या विवाहितेने खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, तिचे लग्न घाटपुरी येथील गणेश विलासराव महल्ले याच्याशी ४ फेब्रुवारी २०२० रोजी जयपूर लांडे येथे झाले. लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळीने तिला चांगले वागविले. मात्र, काही दिवसानंतर तिचा शारिरिक व मानसिक छळ सुरू झाला. पती गुन्हेगारी प्रकृतीचा असल्याचेही विवाहितेच्या निदर्शनास आले.
पती विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचा आरोपही विवाहितेने तक्रारीत केला आहे. दरम्यान, मुलगी झाल्याने सासरच्यांनी छळ केल्याचा आरोपही या विवाहितेने केला आहे. याप्रकरणी तक्रारीवरून खामगाव शहर पोलीसांनी पती गणेश विलासराव महल्ले (३२), सासरे विलास उत्तमराव महल्ले (६५), सासू सविता विलासराव महल्ले (६०), दीर उमेश विलासराव महल्ले (२८) यांच्या विरोधात भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.