हजारो हेक्टवरील हरभऱ्यावर ‘कटवर्म’चे भीषण संकट; हजारो हेक्टरवरील रोपे फस्त
By विवेक चांदुरकर | Published: December 9, 2023 07:11 PM2023-12-09T19:11:49+5:302023-12-09T19:13:50+5:30
शेकडो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक मोडले
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि. बुलढाणा): हरभरा पिकावर हरभऱ्याचे रोप कुरतडणारी अळी (कटवर्म) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक धोक्यात आले असून, अनेक शेतकर्यांनी पीक मोडण्याला सुरूवात केली आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभर्याची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र, हरभऱ्यावर कटवर्म किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गत दहा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे या किडीला पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे जमिनीमध्ये कोषात असलेली अळी बाहेर आली असून, हरभऱ्याच्या छोट्या रोपांची शेंडे कुरतडत आहे. या किडीने हजारो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक फस्त केले आहे. शेतकरी महागडी औषधांची फवारणी करीत आहेत. मात्र तरीही अळी आटोक्यात येत नसून नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी सोयाबिनचे पीक मोडण्याला सुरूवात केली आहे.
वानखेड येथील देविदास उत्तम वरपे यांनी दहा एकरातील हरभऱ्याचे पीक मोडले आहे. त्यांनी हरभर्याची पेरणी केली होती. मात्र कटवर्मचा प्रादुर्भावाने शेतातील हरभऱ्याच्या रोपांचे शेंडे खुडले. त्यामुळे त्यांनी दहा एकरातील पीक मोडले. पेरणीकरिता त्यांना ६० हजार रूपये खर्च आला होता. त्यांना नुकसान सहन करावे लागणार असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे.
-------
कांद्याचेही कटवर्ममुळे नुकसान
कांदा पिकावरही कटवर्म किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांदा पिकाचे नुकसान होत आहे. वानखेड येथील दीपक हागे यांच्या शेतातील एका एकरातील कांदा पीक कटवर्ममुळे पुर्णता उद्धवस्त झाले आहे. हागे यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे.
-------
मी एक एकर शेतामध्ये कांदा पिकाची पेरणी केली आहे. याकरिता हजारो रूपये खर्च केले. मात्र गत तीन ते चार दिवसांपासून कांदा पिकावर कटवर्म किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कांदा पीक उद्धवस्त झाले आहे.
-दीपक हागे, कांदा उत्पादक शेतकरी, वानखेड
-------
मी दहा एकरात हरभऱ्याची लागवड केली होती. यावर्षी अवकाळी पावसाने हरभऱ्याला फायदा होणार, अशी शक्यता होती. मात्र, धुक्यामुळे हरभरा सुकला आहे. त्यातच किडींच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याच्या झाडांची शेंडे खुडली आहेत. त्यामुळे दहा एकरातील पीक मोडले आहे.
-देविदास उत्तम वरपे, शेतकरी, वानखेड
-------
हरभरा पिकावर कटवर्म या हरभऱ्याचे रोप कुरतडणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. अवकाळी पावसाने किडींना पोषक वातावरण मिळाल्याने कीड कोषातून बाहेर आल्याने प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी दोन अळ्या प्रतिमीटर ओळ आढळून आल्यास क्लोरपायरीफाॅस २० टक्के इसी ५० मिली किंवा क्लोरॅट्रनिपाॅल १८.५ टक्के ३ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच अन्य उपाययोजना करायला हव्यात.
-अनिल गाभने, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद