चिखली तालुक्यात अवैध रेतीसाठा जप्त करून हर्राशीची कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:37 AM2017-12-16T00:37:07+5:302017-12-16T00:37:59+5:30
चिखली : तालुक्यातील ब्रम्हपुरी-किन्होळा येथील शिव नदीतून अवैधरीत्या रेतीचा उपसा होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने नदीपात्राची पाहणी केली असता, याठिकाणी आढळून आलेला रेतीसाठा जप्त केला व रात्रीच्या सुमारास हा रेतीसाठा चोरीला जाण्याची शक्यता पाहता मोकास्थळीच त्याच्या हर्रासीची कारवाई केल्याने शासनाच्या महसूलात भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तालुक्यातील ब्रम्हपुरी-किन्होळा येथील शिव नदीतून अवैधरीत्या रेतीचा उपसा होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने नदीपात्राची पाहणी केली असता, याठिकाणी आढळून आलेला रेतीसाठा जप्त केला व रात्रीच्या सुमारास हा रेतीसाठा चोरीला जाण्याची शक्यता पाहता मोकास्थळीच त्याच्या हर्रासीची कारवाई केल्याने शासनाच्या महसूलात भर पडली आहे.
ब्रम्हपुरी-किन्होळा शिव नदीतून अवैधरीत्या रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार मनिष गायकवाड यांच्या निर्देशानुसार निवासी नायब तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी तलाठी अनिल जाधव व पथकासमवेत पाहणी केली असता, नदी पात्रात सुमारे १0 ब्रास रेतीचा अवैध साठा आढळून आला.
दरम्यान, महसूल विभागाचे पथक येथे दाखल होणार असल्याची भनक लागल्याने अवैध रेती उपसा करणार्यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला होता.
या रेतीसाठय़ावर कोणी दावादेखील न केल्याने पथकाद्वारे १0 ब्रास रेतीचा साठा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार जप्त करण्यात आला; मात्र हा रेतीसाठा नदीपात्रातच असल्याने रात्रीच्यावेळी तो चोरीला जाण्याची शक्यता पाहता नायब तहसीलदार कानडजे, तलाठी टेकाळे व इतरांच्या उपस्थितीत तातडीने हर्रासी करण्यात आली. यामध्ये किन्होळा येथील विजय हाडे यांनी १८ हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावल्याने त्यांच्या नावाने हर्रासी कायम केल्याने या माध्यमातून शासनाला १८ हजाराचा महसूल मिळाला आहे.
४७ हजारांची दंडात्मक कारवाई
डोणगाव : येथून जवळच असलेल्या ग्राम लोणी गवळी येथे पांगरखेड येथे कार्यक्रमास जात असताना अपर जिल्हाधिकारी दुबे, तहसीलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी येऊल यांना लोणी गवळी जवळ अवैध रेती वाहतूक करणारे दोन वाहने आढळली. या वाहनांना थांबवून अपर जिल्हाधिकारी दुबे यांनी ४७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. अपर जिल्हाधिकारी दुबे हे लोणी गवळीवरून पांगरखेड येथे कार्यक्रमास जात असताना शुक्रवारला सकाळी ११.३0 वाजता ट्रॅक्टर क्र.एम.एच.३७ एफ २१८९ व टिप्पर क्र.एम.एच.४0 वाय ९९२३ हे अवैध रेती वाहतूक करताना आढळून आले. या वाहनांमध्ये सव्वा तीन ब्रास रेती आढळून आल्याने सदर वाहनांचा पंचनामा तलाठी अमोल राठोड यांनी करून सदर दोन्ही वाहनांवर ४७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने अवैध रेती वाहतूक करणारांचे धाबे दणाणले आहे, तर मेहकर तालुक्यात सकाळ व संध्याकाळ अवैध वाहतूक रेती करणारी वाहने आढळून येतात, यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.