‘हुमनी’ किडीचा प्रादुर्भाव वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:45 AM2017-07-27T01:45:48+5:302017-07-27T01:48:07+5:30
ओमप्रकाश देवकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराआश्रम : शेती व्यवसाय मागील चार ते पाच वर्षांपासून तोट्यात जात असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. यातच तालुक्यातील देऊळगाव साकर्शा परिसरातील शेतकºयांच्या शेतात हुमनी कीड डोके वर काढत आहे. यामुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले असून, या बाबीची पाहणी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी बुधवारी करून शेतकºयांना मार्गदर्शन केले.
मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बहुतांश शेतकºयांनी सोयाबीन पिकांची पेरणी केली. पिके जोमात असताना अचानक पिके कोलमडू लागली. देऊळगाव साकर्शा येथील रमेश पाचपोर यांनी तत्काळ कृषी विभागाला या प्रकारची माहिती दिली. जानेफळचे मंडळ कृषी अधिकारी विनोद सुसर, कृषी सहायक विवेक सिरसाट यांनी तत्काळ बाधित क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ती हुमनी कीड असल्याचे निदर्शनास आले. हुमनी कीड प्रामुख्याने ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका या पिकावर जास्त प्रादुर्भाव करते. नुकसानाची तीव्रता ३० ते ८० टक्के एवढी असून, वालुकामय जमिनीमध्ये अधिक उपद्रव करते.
मशागतीच्या वेळेला फोरेट दहा टक्के दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन तीन टक्के, २५ किलो प्रती हेक्टर जमिनीमध्ये टाकावे किंवा कंपोस्ट बरोबर द्यावे, तसेच ज्या भागात आधीच्या हंगामात हुमनीचा तीव्र प्रकोप आढळून आला आहे. त्या भागातील शेतकºयांनी एप्रिल-मे महिन्यातच शेतीची नांगरणी करावी, तसेच हुमनी अळींचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शनानुसार योजना कराव्यात.
- विनोद सुसर, मंडळ कृषी अधिकारी, जानेफळ.