हिवराआश्रम : वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:42 AM2018-03-29T01:42:05+5:302018-03-29T01:42:05+5:30
हिवराआश्रम: हिवरा आश्रमला कोराडी प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी प्रकल्पात पाणी असूनही ग्रामपंचायत कार्यालय पाणी पुरवठा योजनेचे महावितरणचे विद्युत बिल न भरल्याने नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड तारांबळ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराआश्रम: हिवरा आश्रमला कोराडी प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी प्रकल्पात पाणी असूनही ग्रामपंचायत कार्यालय पाणी पुरवठा योजनेचे महावितरणचे विद्युत बिल न भरल्याने नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड तारांबळ होत आहे. हिवराआश्रम ग्रामस्थ ग्रामपंचायतचा पाणी कर वेळेवर भरत असूनही ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे कोराडी प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी प्रकल्पात पाणी आहे; मात्र ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल न भरल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या प्रकल्पावरून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी तारांबळ उडत आहे.
पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बिल थकीत असल्याने यावर ग्रामपंचायत प्रशासनाने यापूर्वीच उपाय काढायला हवा होता; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने सदर गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. जे ग्रामस्थ पाणी कर वसुलीला सहकार्य करीत नाही, अशा व्यक्तीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर भूमिका द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
येथे वीज वितरण कंपनीचे पॉवर स्टेशन आहे. या पॉवर स्टेशनकडे ग्रामपंचायत कार्यालयाचा कर बाकी आहे, तर ग्रामपंचायतकडे पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बिल थकीत आहे.
या दोन्हीही विभागांनी सामंजस्यांनी भूमिका घेऊन हा प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे; मात्र या दोन विभागाचा ग्रामस्थांना विनाकारण त्रास होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.