लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:01+5:302021-06-21T04:23:01+5:30

बुलडाणा : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. परंतु अनेकांना लस ...

Having to go home after getting vaccinated can be expensive! | लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात!

लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात!

googlenewsNext

बुलडाणा : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. परंतु अनेकांना लस घेतल्यानंतर केंद्रात बसणे जीवावर येते. लसीची ॲलर्जी असलेल्यांसाठी हा अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई महागात पडू शकते. कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची व्याप्ती आता वाढली आहे. आतापर्यंत केवळ ४५ वयाच्यावरील नागरिकांनाच लस दिली जात होती. परंतु आता पुन्हा ३० ते ४४ वयोगटातील लसीकरणालाही १९ जूनपासून सुरुवात करण्यात आल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्काही आता पुढील काही दिवसातच वाढणार आहे. येणारा आठवडा लसीकरणाचे लाभार्थी वाढविणारा आहे. परंतु लस घेत असताना आरोग्य विभागाकडून सांगण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणेही आवश्यक आहे. बहुतांश लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रात अर्धा तास थांबणे अत्यंत आवश्यक असताना, काही नागरिक लस घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटे थांबतात आणि लगेच निघून जात असल्याचे प्रकार अनेक केंद्राच्या ठिकाणी समोर येत आहेत.

लस घेतली, तरीही नियम आवश्यकच

लस घेतल्यानंतर एखाद्याला त्रास झाला, तर त्याला तातडीने वैद्यकीय मदत त्या केंद्रावर मिळते. त्यामुळे लस घेतल्यानंतर लगेचच घरी जाण्याची घाई कुणीही करू नये. अर्धा तास त्या केंद्रातच बसावे. शिवाय कोरोनाची ही लस कोरोनापासून संरक्षणासाठी आहे. त्यामुळे लस घेतली तरीही प्रत्येकाने नियम पाळलेच पाहिजेत. मास्क लावणे, बाहेर सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यकच आहे.

डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

प्रत्येकाला केंद्रात थांबण्याची केली जाते विनंती

आता गावोगावी कोरोना प्रतिबंधित लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शाळा किंवा ग्रामपंचायतमध्ये लसीकरण शिबिर घेतले, तरी त्या ठिकाणीही लस घेणाऱ्यांना थांबण्याची व्यवस्था केली जाते. लसीकरणानंतर प्रत्येकाला केंद्रात थांबण्याची विनंती आम्ही करतो.

डॉ. प्रवीणकुमार निकस, वैद्यकीय अधिकारी.

काय आहे अर्ध्या तासाचे महत्त्व?

कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर लसीमुळे आपल्याला काही दुष्परिणाम जाणवतात का, हे लसीनंतरच्या अर्ध्या तासात समजू शकते. त्यामुळे काही दुष्परिणाम जाणवल्यास तातडीने वैद्यकीय उपचारही घेता येतात. लसीची ॲलर्जी असलेल्यांमध्ये ॲनाफिलॅक्सिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील अर्धा तास महत्त्वाचा असतो. परंतु हा त्रास सर्वांनाच होईल, असे नाही, त्यामुळे घाबरून न जाता प्रत्येकाने लस घ्यावी.

एकूल लसीकरण : ५०६७९५

पहिला डोस: ३९५३१०

दुसरा डोस: १११४८५

एकूण लसीकरण केंद्र : ९०

३० ते ४० वयोगटासाठी केंद्र: ०७

Web Title: Having to go home after getting vaccinated can be expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.