मुख्याध्यापकावर गोळी झाडली!
By admin | Published: June 30, 2017 12:44 AM2017-06-30T00:44:12+5:302017-06-30T00:44:12+5:30
मलकापूर येथील घटना : गोळीबार करणारे पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : स्वत:च्या घरासमोर मोबाइलवर बोलत असताना मुख्याध्यापकावर अज्ञात इसमांनी गोळी झाडल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील घिर्णी रस्त्यावरील महाराणा प्रतापनगरात २८ जूनच्या रात्री १०.४० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमीस गंभीर अवस्थेत कोलते हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर गोळी बाहेर काढण्यात आली असून, रुग्णाची परिस्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, आरोपी फरार झाले असून, पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मोताळा तालुक्यातील निपाणा येथील भिकमसिंह पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक रवींद्रसिंह गुलाबसिंह राजपूत (वय ४६) हे घिर्णी रस्त्यावरील महाराणा प्रतापनगरातल्या त्यांच्या राहत्या घरासमोर रात्री १०.४० वाजता मोबाइलवर बोलत होते. अचानक मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने पाठीमागून त्यांच्यावर गोळी झाडली. पाठीमागून उजव्या बाजूने झाडलेली गोळी पोटाच्या डाव्या बाजूने आतड्यात फसली. दरम्यान, रक्तस्राव झाल्याने रवींद्रसिंह राजपूत खाली कोसळले. गंभीररीत्या जखमी झाल्यावरही त्यांनी रक्ताच्या थारोळ्यातील अवस्थेत शेजारी राहणारा मित्र छोटू व संदेश चोरडिया यांना फोन लावला व त्यांच्या मदतीने रात्री ११ वाजेच्या सुमारास कोलते हॉस्पिटल गाठले.
शल्यचिकित्सक डॉ.अरविंद कोलते व डॉ.गौरव कोलते यांनी तत्काळ रुग्णास आॅपरेशन थिएटरमध्ये दाखल केले व उपचार सुरू केले. तब्बल अडीच तासंच्या शस्त्रक्रियेनंतर रवींद्रसिंह राजपूत यांच्या पोटातील गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. सद्यस्थितीत रुग्णास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, प्रकृती स्थिर पण नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेत अज्ञात इसम कोण असावेत व त्यांनी कोणत्या कारणावरून गोळी झाडली, यासंदर्भात अद्याप उलगडा झाला नाही. शहर पोलिसांनी जखमीची पत्नी सपना रवींद्रसिंह राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३०७, ३४ भादंवि आर्मअॅक्ट ३, २५ नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे महाराणा प्रताप नगरात एकच खळबळ उडाली आहे.
‘त्या’ घटनेची आठवण
या आधी सन २०१२ साली देखील अज्ञात दरोडेखोरांनी मुख्याध्यापक रवींद्रसिंह राजपूत यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता. त्यात चार जणांना रवींद्रसिंह यांनी एकट्याने रोखले असता त्यातील एकाने धारदार शस्त्राचा वार करून त्यांना गंभीररीत्या जखमी केले होते. त्या घटनेस यानिमित्ताने उजाळा मिळाला.