‘स्क्रब टायफस’वर नियंत्रणासाठी आरोग्य पथक टेंभूर्णात दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:31 PM2018-09-01T15:31:51+5:302018-09-01T15:32:52+5:30
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’ने ‘एन्ट्री’ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस येताच, जिल्हा आरोग्य प्रशासन तातडीने कामाला लागले आहे.
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’ने ‘एन्ट्री’ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस येताच, जिल्हा आरोग्य प्रशासन तातडीने कामाला लागले आहे. ‘स्क्रब टायफस’चा पहिला रुग्ण आढळलेल्या टेंभूर्णा येथे शुक्रवारी पहाटेच आरोग्य विभागाचे ११ सदस्यीय दाखल झाले असून, या पथकाकडून ताप आणि किटक सर्वेक्षणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
‘स्क्रब टायफस’ या आजाराचा बुलडाणा जिल्ह्यातील पहिला रुग्ण खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथे आढळल्याचे स्पष्ट होताच, आरोग्य प्रशासनाचे पथक शनिवारी पहाटेच टेंभूर्णा येथे दाखल झाले. या पथकाकडून गावातील नागरिकांचा ताप नमुना सर्वेक्षण करण्यात आले. तसेच किटक सर्वेक्षणावरही यावेळी भर देण्यात आला. काही ठिकाणी उंदराचे पिंजरे लावून किटकाचा शोध घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या मदतीने मॅलेथिआॅन फवारणीही करण्यात आली. तसेच तापाचे औषध देण्यात आले. ‘स्क्रब टायफस’ या आजाराची गंभीर दखल घेत टेंभर्णासह संपुर्ण जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
किटक सर्वेक्षणाद्वारे किटाणुचा शोध!
जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाकडून शनिवारी पहाटेच ताप सर्वेक्षण करण्यात आले. तसेच रक्तजल नुमने संकलित करण्यात आल्यानंतर किटक सर्वेक्षणाद्वारे किटाणुचा शोध घेण्यात आला. काही ठिकाणी उंदराचे पिंजरेही या पथकाकडून लावण्यात आले.
जिल्हा हिवताप अधिकारी तळ ठोकून!
जिल्हा आरोग्य केंद्राच्या ४ सदस्यीय पथकासोबतच अटाळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शीघ्र प्रतिसाद पथकाचे ७ सदस्य आणि खामगाव सामान्य रूग्णालयाचे २ असे एकुण १३ सदस्य पहाटेच टेंभूर्णात दाखल झाले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस.बी. चव्हाण आपल्या पथकासह टेंभूर्णा येथे तळ ठोकून होते. यामध्ये आरोग्य सहायक बी.बी.बढे, ए.जे. बिलावी, बी.सी. जाधव, पी.डी. जाधव,एम.आर. वाघ यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक पहाटेपासून गावात तळ ठोकून होते.
नागरिकांच्या रक्त नमुन्यांची तपासणी!
आरोग्य विभागाच्या विशेष कृतीदल पथकाकडून टेंभूर्णा येथील नागरिकांच्या रक्तजल नमुने घेण्यात आले.पथकाकडून संकलीत नमुणे तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येतील.
डेंग्यू आजाराच्या रुग्णसंख्येत विसंगती!
खामगाव शहरात आढळून आलेल्या डेंग्यू आजाराच्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने कमालिची विसंगती आढळून येत असल्याचे शनिवारी उघडकीस आले. संपूर्ण जिल्ह्यात डेग्यू आजाराचे ८१ रुग्ण नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे खामगाव येथील पॅथालॉजीमधील रुग्णसंख्येबाबत विसंगती दिसून येते. रुग्णसंख्येबाबत नियमित माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. मात्र, शहरातील चार पैकी दोन पॅथालॉजी लॅबच्या संचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना अहवाल देण्यास नकार दिला. तर एका लॅब मध्ये डेंग्यूचे केवळ ५ संशयीत रुग्ण आढळून आले. त्यामुळे खामगाव येथील डेंग्यू आजाराच्या रुग्णसंख्येबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
दैनंदिन अहवाल सादर करण्यास खो!
डेंग्यू या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी तसेच रुग्णसंख्येबाबत माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खामगाव शहरातील खासगी डॉक्टर्स तसेच पॅथालॉजी संचालकांना जिल्हा आरोग्य प्रशासनाने पत्र दिले आहे. मात्र, याबाबत खामगाव शहरातील डॉक्टर्स तसेच पॅथालॉजीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. शनिवारीही दोन पॅथालॉजीच्या संचालकांनी अहवाल सादर केला नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.