१५ दिवसांपासून आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तकांचा संप; मुलांचे लसीकरण प्रभावित

By विवेक चांदुरकर | Published: November 4, 2023 05:33 PM2023-11-04T17:33:04+5:302023-11-04T17:33:56+5:30

दिवाळी सण आठ दिवसांवर आला असतानाच आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तकांचा तसेच कृषी सेवा केंद्राच्या बंदमुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

Health workers, Asha group promoters strike for 15 days; Immunization of children affected | १५ दिवसांपासून आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तकांचा संप; मुलांचे लसीकरण प्रभावित

१५ दिवसांपासून आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तकांचा संप; मुलांचे लसीकरण प्रभावित

खामगाव : गत पंधरा दिवसांपासून आरोग्य कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून लसीकरण प्रभावित झाले आहे. तसेच आशा गटप्रवर्तकांच्या संपामुळे ग्रामीण भागातील महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिवाळी सण आठ दिवसांवर आला असतानाच आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तकांचा तसेच कृषी सेवा केंद्राच्या बंदमुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

आशा ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जाणे, रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचे काम करतात. जननी सुरक्षा योजना राबविण्याची जबाबदारी आशांवर आहे. मात्र, संपामुळे गर्भवती महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच आभा कार्ड ऑनलाइन करण्याचे काम बंद पडल्याने नागरिकांना सेतू केंद्रांवर जाऊन आभा कार्ड ऑनलाइन करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

२००७ पासून भरती झालेले विविध २,५०० कर्मचारी १७ वर्षांपासून आरोग्यविषयक सेवा देत आहेत. बालकांचे लसीकरण, प्रसूती, आरोग्यवर्धिनी केंद्रे बंद आहेत. सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या आहेत. आरोग्य कर्मचारी लहान मुलांचे लसीकरण करतात. संपामुळे लसीकरण ठप्प प्रभावित झाले आहे. लसीकरणाचे टप्पे ठरलेले आहेत. ठरावीक दिवसांनी लसीकरण करणे आवश्यक असते. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी

कृषी केंद्र चालकांनी संप पुकारला आहे. सध्या सोयाबीनची काढणी झाली असून रब्बी हंगामातील पेरणीला प्रारंभ होणार आहे. त्याकरिता शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर बियाणे व खते खरेदी करण्याकरिता जात आहेत. मात्र, कृषी सेवा केंद्र बंद असल्याने त्यांची कोंडी होत आहे. कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्याकरिता औषधांची गरज आहे. मात्र, संप सुरू असल्याने फवारणी लांबणीवर पडली आहे. 

केवळ कंत्राटी कर्मचारी संपावर आहेत. नियमित कर्मचारी संपावर नाहीत. लसीकरण नियमित कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. लसीकरण प्रभावित झाले नाही.

- डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा

Web Title: Health workers, Asha group promoters strike for 15 days; Immunization of children affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.