हृदयरोगग्रस्त विद्यार्थ्यांंना मिळाले नवजीवन
By admin | Published: September 24, 2015 01:25 AM2015-09-24T01:25:35+5:302015-09-24T01:25:35+5:30
हृदय जागृती दिवस; पाच वर्षांंत साडेपाच हजार शस्त्रक्रिया.
बुलडाणा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्यभरातील शाळांमध्ये राबविण्यात येतो. यातून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंंतच्या विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी केली जाते. या कार्यक्रमांतर्गत झालेल्या आरोग्य तपासणीत ज्या विद्यार्थ्यांंमध्ये हृदयरोग आढळून आला, गत पाच वर्षांंंत अशा ५ हजार ४९३ विद्यार्थ्यांंच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या हदयाची धडधड कायम ठेवली. विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ असून, त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्व तसेच नागरी भागातील महानगरपालिका व नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांंंची दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. यात गरजू विद्यार्थ्यांंंना हृदयाच्या शस्त्रकियेसारख्या वैद्यकीय सेवा मोफत पुरविल्या जातात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत गत पाच वर्षांंंत राज्यातील ३ लाख ८८ हजार २४८ शाळांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत ५४९ लाख विद्यार्थ्यांंंची मोफत आरोग्य तपासणी व उपचार देण्यात आला. हृदयरोग आढलेल्या ५ हजार ४९३ विद्यार्थ्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली.