ह्रदयद्रावक! शेतकरी महिलेनं स्वत:च रचलं सरण, त्यातच पत्करलं मरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 07:38 AM2018-11-16T07:38:14+5:302018-11-16T07:38:49+5:30
बुलडाण्यातील हृदयद्रावक प्रकार; आर्थिक कोंडीमुळे उचलले पाऊल
बुलडाणा : सततची नापिकी आणि दुष्काळामुळे तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथे एका शेतकरी महिलेने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री घडली. याच महिन्यात गावातीलच एका तरुण शेतकऱ्यांनेही गळफास लावून आत्महत्या केली होती. तसेच २००२मध्ये गावातील एका वृद्ध शेतकºयाने अशाचप्रकारे सरण रचून आत्महत्या केली होती.
धोत्रा भनगोजी येथील आशा दिलीपराव इंगळे यांनी बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गोठ्यात लाकडे रचून सरण रचले व त्यावर स्वत:ला पेटवून घेतले. त्यात त्यांचा जळून मृत्यू झाला. मृत शेतकरीमहिला आशा यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून त्यांना दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले रोजंदारीने कामावर जातात. एका मुलीचे लग्न झालेले आहे. त्यांचे पती दिलीपराव इंगळे यांचे २००८ मध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या हिमतीने कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविला. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या अल्प शेतात सातत्याने अत्यल्प उत्पन्न येत असल्याने प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती.
८० हजारांचे होते कर्ज
आशा यांच्यावर जिल्हा सहकारी बँकेचे ८० हजारांचे कर्ज तसेच काही खासगी देणे बाकी होते. यावर्षी सोयाबीनचे अत्यल्प उत्पन्न हाती आल्यानंतर त्यातून त्यांनी काही देणेकरांचे पैसे चुकते केले. मात्र, पुढे परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याने त्या काही दिवसांपासून नैराश्येत होत्या.