उष्णतेची लाट, लोणारवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:17+5:302021-04-06T04:33:17+5:30
दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. विदर्भात ५ ते ७ एप्रिल या कालावधीत उष्णतेची दुसरी लाट ...
दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. विदर्भात ५ ते ७ एप्रिल या कालावधीत उष्णतेची दुसरी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे तापमानात गेल्या आठवड्यात मोठी वाढ झाली होती. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत गेला होता. सध्या काही भागांत गहू काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. परंतु दुपारच्या वेळेस जास्त उन्हाच्या झळा राहत असल्याने, अनेक शेतकरी सकाळी ११ वाजेपर्यंत आपले काम आटोपताना दिसून येत आहेत. तालुक्यात तापमान सरासरीच्या जवळ आणि ४० अंश सेल्सिअसच्या खाली आहे. वाढत्या तापमानामुळे लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. वाढते तापमान पाहता, अनेक नागरिक आता दुपारच्या वेळेस घराच्या बाहेर पडत नाहीत. दोन दिवसांनंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, ५ ते ७ एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे.
थंड पेयाच्या विक्रीत वाढ
लोणार येथे सोमवारी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे थंड पेयाच्या विक्रीत वाढ झाली आहे. पालकांनी मुलांना उन्हापासून दूर ठेवावे, तसेच शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.