कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:27+5:302021-05-17T04:33:27+5:30
बुलडाणा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये विविध आजारांचे रुग्ण घरीच बसलेले आहेत. त्यात कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळल्याचे ...
बुलडाणा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये विविध आजारांचे रुग्ण घरीच बसलेले आहेत. त्यात कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळल्याचे चित्र आहे. ऊन लागले, तरीही रुग्णांनी दवाखान्यात न जाता घरीच उपचार घेतले. त्यामुळे यंदा आरोग्य विभागालाही उष्माघात कक्षाचा विसर पडल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान तापमान साधारणत: ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्चमध्येच उष्माघात कक्ष तयार करण्यात येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपचार करावे, याबाबत दरवर्षी सूचना देऊन त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हातही उष्माघात कक्ष उभारण्यात आल्याचे दिसून येत नाही. मागील वर्षी एप्रिलअखेर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला होता. दरम्यान, त्या काळात बुलडाण्यातील तापमानही ४२.५ अंश सेल्सिअसच्या वर गेलेले होते. हवामान खात्यानुसार विदर्भातील अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे तापमानात नेहमीच समोरच असतात. बुलडाणा जिल्ह्याला लागून असलेल्या अकोल्याचे तापमानही अधिक राहत असल्याने थोडाफार फटका जिल्ह्यातही बसण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे पूर्व उपाययोजना बुलडाणा जिल्ह्यातही केल्या जातात. परंतु यंदा तशा उपाययोजना दिसून येत नाहीत. दरवर्षी मे महिन्यात भीती वाटणाऱ्या उन्हाचा यंदा कोरोनाच्या भीतीने चटकाच लागला नाही.
मेच्या सुरुवातीला वाढले होते तापमान
जिल्ह्यात एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. साधारणत: ४० अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान गेले होते. मात्र त्यावेळेसही उष्माघात कक्ष उभारण्याविषयी नियोजन झाले नाही. यंदा एप्रिल हीटही तसा जाणवला, मात्र कोरोनापुढे सर्व आजार आता थंड पडले आहेत.
ऊन लागल्यानंतर घरगुती उपचारावर भर
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढलेला असल्याने इतर काही छोटे आजार घरगुती उपचाराने बरे करण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. ऊन लागल्यानंतरही अनेकजण घरगुती उपचारावर भर देत आहेत. ऊन लागल्यास गूळ खाणे, शेळी किंवा गाईचे दूध अंगाला, तळपायाला लावणे, कांद्याचा रस डोक्याला लावणे असे काही घरगुती उपचार केले जातात.
दरवर्षी प्रत्येक केंद्रावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. रुग्ण आल्यास तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात येते. यावर्षी उष्माघाताचा रुग्ण आला नाही.
-डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.