पर्यटकांमुळे शेगावकरांना स्वाइन फ्लूचा धोका!
By admin | Published: July 1, 2017 12:03 AM2017-07-01T00:03:12+5:302017-07-01T00:03:12+5:30
वातावरणातील बदलामुळे लागण होण्याची शक्यता अधिक
फहीम देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : राज्यातील मोठ्या शहरांमध्ये स्वाइन फ्लूने कहर केलेला असून, मोठ्या शहरातील हा आजार आता विदर्भात पोहचला आहे. पर्यटकांच्या पसंतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या शेगाव शहराला स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा जोर वाढल्याने स्वाइनचा धोका कमी होईल, असे वाटत असतानाच आता पावसाळा सुरु झाल्याने वातावरणात गारठा पसरला. परिणामी स्वाइन फ्लूला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.
बदलेल्या वातारवणामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. राज्यभरातून पर्यटक शेगावात पोहचत आहेत.
लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे मागील आठवड्यात शेगाव हाऊसफुल्ल झाले होते. अशा परिस्थितीत इतर शहरातून आलेल्या एखाद्या रुग्णामुळे स्वाइन फ्लू या भागातही पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज
जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण असून, त्यांचे नमुनेच पाठविण्यात आले नसल्यामुळे निदान होत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र हात झटकत असून, स्वाइन फ्लूचे रुग्णच नसल्याचा दावा करीत आहे. असे असले तरी जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा धोका सर्वात जास्त शेगाव शहराला आहे. याठिकाणी पर्यटक आणि राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.