सिंदखेडराजा तालुक्यात कांदा पिकाचे प्रचंड नुकसान
By admin | Published: April 16, 2015 12:37 AM2015-04-16T00:37:48+5:302015-04-16T00:37:48+5:30
वादळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा बियाणे पिकाचे नुकसान.
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): : सिंदखेडराजा तालुक्यात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर १५ एप्रिल रोजी पाचव्या दिवशीही वादळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा बियाणे पिकाचे नुकसान झाले आहे. साखरखेर्डासह सवडद, मोहाडी, राताळी, गुंज, वरोडी, शेवगा जहाँगीर, सावंगीभगत परिसरात चवथ्या दिवशी गारपीट झाल्यानंतर १५ एप्रिल रोजी वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सावंगी भगत शिवारात सुधिरआप्पा बेंदाडे यांचा कांदा जमिनीवर लोळला आहे. केवळ आठ दिवसावर काढणीला आलेला कांदा या अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने पाच एकरवरील सिड्स कांदा जमिनदोस्त झाला आहे. साखरखेर्डा भाग १ आणि भाग २ मधील कांदा आणि भाजीपाला पिकालाही मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. सुधाकर गवई, वामन संपत जैवळ यांचेसह १0 ते १५ शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. सवडद, मोहाडी भागातून वाहणारी कोराडी नदी दुतर्फा वाहत होती. नालेही खळाखळा वाहली. साखरखेर्डा भागाचा सर्वे करुन त्यांनाही नुकसान भरपायी मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण करून तात्काळ मदत देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्या जाईल, अशी माहिती आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली. नुकसानग्रस्त शेतकर्यांनी आपल्या शेतातील नुकसानीचा पंचनामा होईल, याची काळजी घ्यावी. तसेच नुकसानीबाबत प्रशासनास अवगत करावे, असेही आवाहन आ.डॉ.खेडेकर यांनी केले आहे.