लोणवाडी परिसरात मुसळधार, ११ जनावरे दगावली
By सदानंद सिरसाट | Published: September 24, 2023 04:18 PM2023-09-24T16:18:45+5:302023-09-24T16:20:54+5:30
गावातील नदीकाठावर बांधलेल्या ११ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये गायी, म्हशी, बैलांचा समावेश आहे.
लोणवाडी, नांदुरा (जि. बुलढाणा) : नांदुरा तालुक्यातील लोणवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यंत ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस पडल्याने गावातील नदीला आलेल्या पुरात काठावर बांधलेल्या ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तसेच तीन वगार पाण्यात वाहून गेल्या आहेत. नदीवर असलेला लघुसिंचन प्रकल्प अंदाजे ६० टक्के भरला आहे.
परिसरात शनिवारी मध्यरात्री १२ वाजेनंतर सकाळी सहा वाजेपर्यंत संततधार ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे नदीला पूर आला. त्यात शेती खरडून गेली. तर गावातील नदीकाठावर बांधलेल्या ११ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये गायी, म्हशी, बैलांचा समावेश आहे. पशुपालक पंजाबराव सोळंके, भीमराव सोळंके, अवचित सोळंके, शत्रगुण सोळंके यांचे नुकसान झाले आहे, तसेच गोठ्यात असलेल्या तीन लहान वगारा पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्या अद्याप सापडलेल्या नाहीत.
लघुसिंचन प्रकल्पाचा कालवा ओसंडून वाहिल्याने शेती खरडून गेली. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. तसेच लोणवाडी लघु प्रकल्पाच्या वर असलेल्या खडतगावात सुद्धा पावसाचे पाणी घुसले. काहींच्या घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले. मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी तात्काळ भेट देऊन मृत गुराढोरांची पाहणी केली. विभागाला पंचनामा करण्याचा आदेश दिला. यावेळी तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.