जिल्ह्यात जोरदार पावसाने उडविली दाणादाण; हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
By विवेक चांदुरकर | Published: September 12, 2022 04:10 PM2022-09-12T16:10:38+5:302022-09-12T16:11:38+5:30
रविवारी सायंकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
खामगाव: जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह रविवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच दाणादाण उडविली. या पावसामुळे हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारी सायंकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात ६० मिमी पाऊस झाला. या पावसामुळे काही भागात झाडे पडली असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. तसेच खामगाव शहरात टाॅवरवर वीज पडून नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. यावर्षी शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये पाऊस न झाल्याने पेरणी केली नाही. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशीची पेरणी केली. मात्र, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी उलटली. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली.
परिणामी उत्पादन खर्च वाढला. सोयाबीन व कपाशीचे पीक उत्तम स्थितीत असताना गत दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक एक महिन्यानंतर काढणीला येणार होते. मात्र शुक्रवारी व शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. खामगाव तालुक्यातील बोरी, अडगाव, बोथाकाजी, पळशी बू या परिसरात शेतात पाणी साचले असल्यानेही पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खामगावातील विद्युत पुरवठा बंद
शनिवारी सायंकाळी शहरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागले. वाडी गावातील विद्युत पुरवठा सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान खंडित झाला होता. रात्री १२ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ग्रामीण भागातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.
आगामी दोन दिवस सार्वत्रिक पावसाची शक्यता
जिल्ह्यात शनिवार व रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. तसेच आगामी दोन दिवस १३ व १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर १६ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.