जळगावात जोरदार पाऊस; तालुका मात्र कोरडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 01:04 AM2017-06-03T01:04:25+5:302017-06-03T01:04:25+5:30
जळगाव जामोद : जळगाव शहरात गुरुवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह अर्धा तास जोरदार पाऊस झाला; परंतु हा पाऊस फक्त शहरात व शहराच्या आजूबाजूच्या परिसरातच बरसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : जळगाव शहरात गुरुवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह अर्धा तास जोरदार पाऊस झाला; परंतु हा पाऊस फक्त शहरात व शहराच्या आजूबाजूच्या परिसरातच बरसला. तालुक्यात मात्र पाऊस झाला नाही. गत दहा वर्षांमध्ये प्रथमच १ जून रोजी पावसाची नोंद झाली. जळगाव शहरासोबतच अल्प पाऊस वडशिंगी परिसरातसुद्धा झाला. या पावसाने शेतकरी वर्ग शेतीच्या मशागतीसाठी आणखी जोमाने लागला आहे.
जळगाव तालुक्यात जळगाव, जामोद, वडशिंगी, आसलगाव व पिंपळगाव काळे अशा पाच ठिकाणी महसूल विभागाच्यावतीने जलमापन यंत्र बसविण्यात आले आहे. गुरुवारी जळगावात ३९ मि.मी. पावसाची नोंद झाली तर जामोद, आसलगाव व पिंपळगाव काळे येथे पाऊसच झाला नाही. वडशिंगी येथे अल्प पाऊस झाला येथे ७ मि.मी. पावसाची नोंद झाली. एक जून रोजी पावसाने हजेरी लावण्याची ही दहा वर्षांतील पहिलीच वेळ आहे.
नाल्याची भिंत कोसळली
पोटचिरीच्या नाल्यावर नव्यानेच उभारण्यात आलेल्या भिंतीची एक कडा विद्या नगर परिसराजवळ पाण्याच्या दाबाने कोसळली. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने विद्या नगर परिसरातील पाणी या भिंतीला थडकले आणि भिंत कोसळली. या नाल्यात येणाऱ्या कॉलनीतील पाण्यासाठी वाट ठेवावयास पाहिजे होती; परंतु तसे डिझाइन नसल्याने नवीनच उभारलेली भिंत नाल्यात कोसळली. नगर परिषदेचे काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप, नगरसेवक नितीन ढगे, श्रीकृष्ण केदार यांनी हा विषय बोगस कामांचा नमुना असल्याचे म्हटले. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, अभियंता म्हस्के यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
खामगाव परिसरात रिमझिम
खामगाव शहर व परिसरात शुक्रवारी सकाळी रिमझिम पाऊस झाल्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. दरवर्षी तालुक्यालगत असलेल्या भागात पाऊस होत असताना खामगाव परिसरात मात्र पाऊस हुलकावणी देत असल्याचा अनुभव आहे. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाचीसुद्धा परिसरात हुलकावणी देत असल्याने आतापासूनच चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून, पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. सर्वच वाणांचे बाजारभाव कमी होत असल्याने कोणते पीक घ्यावे, या गर्तेत शेतकरी सापडला आहे.