लोणार तालुक्यात दमदार पाऊस
By admin | Published: August 11, 2015 11:28 PM2015-08-11T23:28:31+5:302015-08-11T23:28:31+5:30
खरीप पिकांना संजीवनी; नदी-नाल्यांना पूर.
लोणार (जि. बुलडाणा) : गत दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यानंतर लोणार तालुक्यावर वरुणराजाची कृपा झाली आहे. मंगळवारी सकाळी १२ पासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाल्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाने खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. तालुक्यातील हिरडव, वडगाव तेजन, किन्ही, गुंधा, बोरखेडी, देऊळगाव कुंडपाळ, टिटवी, पिंपळनेर परिसरासह सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवार चिंब पावसाने आबादाणी झाले. मृगाच्या पावसावर पेरणी झालेल्या खरीप पिकांना अलीकडच्या दमदार पावसाने संजीवनी मिळाली आहे. तालुक्यातील गुंधा, अंभोरा, देऊळगाव कुंडपाळ, गंधारी, टिटवी, पिंपळनेर, बोरखेडी धरणातील मृत साठय़ामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला असला तरी पिण्याच्या पाण्याकरिता दमदार पावसाची गरज आहे. दरम्यान, मंगळवारी पावसाने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.