धुळ्यात पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:31 PM2019-07-03T22:31:06+5:302019-07-03T22:31:30+5:30
सखल भागात पाणी साचले : पावसाच्या आगमनाने शहरवासिय सुखावले
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात बुधवारी दुपारी वरूणराजाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले होते. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धुळेकर सुखावले आहेत.
पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी धुळ्यात पाऊस झाला नव्हता. रोजचा दिवस कोरडा जात असल्याने, शहरवासियांच्या चिंता वाढल्या होत्या. ऐन पावसाळ्यातही उन्हाळ्याप्रमाणेच उकाडा कायम होता.
मात्र सोमवारपासूनच मान्सुन सक्रीय झाला असल्याने, सर्वत्र पाऊस होत आहे. धुळ्यातही वरूणराजाची कृपा होऊ लागली आहे.
बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच अधुन-मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र दुपारी दोन वाजेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती. अनेकांनी पावसापासून बचावासाठी दुकानांच्या शेडचा आधार घेतला होता. दरदार पावसामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचले होते. अंत्यत वर्दळीच्या असलेल्या पोलीस मुख्यालयासमोरील खोल रस्त्यातही पाणी साचल्याने या परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढतांचा दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत होती. अनेकांनी रस्त्यावर जास्त प्रमाणात पाणी साचल्याने मार्ग बदलणे पसंत केले होते.
दरम्यान बुधवारी सायंकाळपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते. सलग दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. आतापर्यंत १२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.