जोरदार पावसाने कपाशी उत्पादकांच्या आशेवर फेरले पाणी
By विवेक चांदुरकर | Published: October 7, 2022 04:16 PM2022-10-07T16:16:53+5:302022-10-07T16:21:46+5:30
गतवर्षी कपाशीला दहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळाला. त्यामुळे यावर्षी कपाशीची पेरणी वाढली.
खामगाव - जिल्ह्यात गत दोन दिवसात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. गतवर्षी कपाशीला जास्त भाव असल्याने जिल्ह्यात २ लाख २ हजार ९९७ हेक्टरवर शासनाच्या नियोजनापेक्षा ११० टक्के जास्त पेरणी झाली होती. यावर्षीसुद्धा कपाशीला चांगला भाव आहे. मात्र, पावसामुळे कपाशीचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. ७ ऑक्टोबर रोजी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 22.1 मिमी पाऊस झाला.
गतवर्षी कपाशीला दहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळाला. त्यामुळे यावर्षी कपाशीची पेरणी वाढली. शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी कपाशी पेरणीवर भर दिला. जिल्ह्यात २०२९९७.४० हेक्टरवर ११०.५९ टक्के कपाशीची पेरणी झाली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. ७ ऑक्टोबर रोजी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ५७.१ मिमी पाऊस झाला. सध्या कपाशीच्या झाडांना बोंडे धरली आहेत. शेतकऱ्यांनी महागडी खते देऊन तसेच बोंडअळीपासून संरक्षण करण्याकरिता महागड्या औषधांची फवारणी करून कपाशीची पिके जगवली. मात्र, गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बोंडांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. कपाशीसोबतच पावसामुळे सोयाबीनचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनची ३ लाख ९७ हजार ४५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आगामी एका आठवड्यात सोयाबीनची सोंगणी करून पीक बाजारात येणार आहे. काही शेतकऱ्यांनी सोंगणी करून सोयाबीनचे ढीग शेतात लावले आहेत. त्यापूर्वीच झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
आगामी पाच दिवस आणखी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. तालुक्यात ऑक्टोबर महिन्याची पावसाची सरासरी ५७.१ मिमी आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात २२.१ मिमी पाऊस झाला असून, आगामी पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तसेच १४ ते २० ऑक्टोबरपर्यंत कोरडा आठवडा राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जिल्ह्यात ९० टक्के पाऊस
जिल्ह्याची पावसाची सरासरी ७६१.६ मिमी आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ६९२.२ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या ९०.८९ टक्के पाऊस झाला आहे. बुलडाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, संग्रामपूर तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर लोणार तालुक्यात सर्वात कमी ७१.९३ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात ७ ऑक्टोबरपर्यंत झालेला पाऊस
तालुका पाऊस मिमी टक्केवारी
बुलडाणा ९०५.० १०५.१८
चिखली ७८५.५ ९३.६१
देऊळगाव राजा ७२४.४ १०२.८१
सिंदखेड राजा ८१०.० १०१.०१
लोणार ६२७.७ ७१.९३
मेहकर ७७६.२ ९२.२६
खामगाव ६२८.७ ८७.७५
शेगाव ६६३.८ ९७.२६
मलकापूर ५५६.९ ७८.९१
नांदुरा ६२९.५ ८४.३५
मोताळा ५९६.१ ८३.६७
संग्रामपूर ७८१.० १०१.८३
जळगाव जामोद ५६४.४ ७९.८२
सरासरी ६९२.२ ९०.८९
आगामी पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनचे लावलेले ढीग ताडपत्रीने, मेनकापडाने झाकून ठेवावे. तसेच पावसाचा अंदाज घेऊन सोयाबीनची काढणी करावी.
- मनीष येदुलवार, हवामान तज्ज्ञ, बुलडाणा