जिल्ह्यात वादळी पाऊस, वीज पडून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:23 AM2021-02-19T04:23:52+5:302021-02-19T04:23:52+5:30
हवामान खात्याने १७ व १८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो तंतोतंत खरा ठरला. गेल्या तीन ...
हवामान खात्याने १७ व १८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो तंतोतंत खरा ठरला. गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दरम्यान गुरूवारी दुपारी बुलडाणा शहरासह तालुक्यात मेगगर्जनेसह पाऊस पडला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास या पावसास प्रारंभ झाला होता. यादरम्यान तादुळवाडी येथे शेतात काम करण्यासाठी गेलेल्या बाबुराव भाऊराव रिंढे (६०)या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यानी दिली. बुलडाणा तालुक्यात जवळपास दीड ते दोन तास हा अवकाळी पाऊस हलक्या स्वरुपात पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरबरा, कांदा पिकाचे आणि काही भागात फळबागांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर चिखली तालुक्यात एका शेतकऱ्याची हरभऱ्याची सुटी वीज पडल्याने जळून खाक झाली. या व्यतिरिक्त घाटाखालील तालुक्यातही दिवसभर ढगाळ वातावरण होते.
दिवठाणा परिसरात गारपीट
दिवठाणा: चिखली तालुक्यातील दिवठाणा परिसरात दुपारी अवकाळी पावसास सुरूवात झाली. दिवठाण्यासह, सवणा, बोरगाव वसू, सोमठाणा या भागात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात गहू, हरभरा, कांदा पिकासह काही ठिकाणी लावलेल्या फळबागांचेही मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. अर्धा तासाच्या आसपास या भागात काही ठिकाणी गारपीट झाली. हरभऱ्याच्या आकाराच्या गारा या भागात पडल्या.
अंधेरा येथेही वादळी पाऊस
देऊळगाव राजा तालुक्याती अंढेरा परिसरातही वादळी पाऊस झाला. अद्यापही या भागात ढगाळ वातावरण असून सायंकाळ दरम्यान काही भागा तुरळक स्वरुपात अवकाळी पाऊस पडला. अंढेरा येथे अवकाळी पावसाने २०१८ मध्ये मोठे नुकसान केले होेते.