जिल्ह्यात दमदार पाऊस, पेरण्यांचा वेग वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:04+5:302021-06-25T04:25:04+5:30
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पेरणी योग्य क्षेत्रापैकी २८ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या होत्या. या पावसामुळे प्रारंभी पेरणी झालेल्या पिकांना संजीवनी ...
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पेरणी योग्य क्षेत्रापैकी २८ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या होत्या. या पावसामुळे प्रारंभी पेरणी झालेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९ मिमी पाऊस झाला असून, यामध्ये सर्वाधिक पाऊस हा मेहकर तालुक्यात २१.२ मिमी, अवर्षणाच्या उंबरठ्यावर असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यात १८.३ मिमी तर राज्य शासनाच्या १९८० च्या अवर्षण प्रवण तालुक्यांच्या यादीत असलेल्या मोताळा तालुक्यात १६ मिमी, सिंदखेड राजा तालुक्यात १३ मिमी, नांदुरा तालुक्यात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात ७ लाख ३४ हजार ११७.२२ हेक्टरवर कृषी विभागाचे नियोजन असून, गेल्या आठवड्यापर्यंत २८ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली होती. या पावसामुळे आता पेरण्यांचा वेग वाढणार असून ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज आहे. प्रकल्पांमध्येही २२ टक्के जलसाठा असून प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे.
--ओल पाहूनच पेरणी करावी--
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत संततधार स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी एक ते दोन दिवसांचा अंदाज घेऊन जमिनीतील ओल पाहत शेतकऱ्यांनी पेरणीस प्राधान्य द्यावे, असे जिल्हा कृषी हवामान केंद्राचे तज्ज्ञ मनेष येदुलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दुसरीकडे शुक्रवारी हवामान खात्याचा सुधारित अंदाज आगामी आठ दिवसांसाठी येणार आहे.
--शेगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस--
जिल्ह्यात या वर्षी शेगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तो अवघा १.५७ टक्के आहे. गेल्या वर्षी या तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १५ टक्के पाऊस झाला होता. यावरून येथील परिस्थिती बिकट होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शेगाव तालुक्यात आता दमदार पावसाची गरज आहे. नांदुरा तालुक्यातही वार्षिक सरासरीच्या ६ टक्केच पाऊस झाला आहे तर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातही अवघा तीन टक्केच पाऊस झाला आहे.