संततधार पावसाचा जिल्ह्याला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:47+5:302021-09-08T04:41:47+5:30

जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली होती. मध्यरात्रीदरम्यान जोरदार बरसणारा पाऊस ७ सप्टेंबरला सकाळी ९ वाजेपर्यंत बरसत होता. ...

Heavy rains hit the district | संततधार पावसाचा जिल्ह्याला तडाखा

संततधार पावसाचा जिल्ह्याला तडाखा

Next

जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली होती. मध्यरात्रीदरम्यान जोरदार बरसणारा पाऊस ७ सप्टेंबरला सकाळी ९ वाजेपर्यंत बरसत होता. दरम्यान, खामगाव, पिंपळगाव राजा, हिरवखेड, काळेगाव, वरवंड, लोणी, जवळा या सात मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. ९५ ते ६७ मिमी दरम्यान या मंडळांमध्ये पाऊस बरसला आहे. बुलडाणा तालुक्यात पैनगंगा नदी उगमस्थानापासूनच दुथडी भरून वाहत आहे. प्रारंभाला नदीचे पात्र छोटे असल्याने, नदीकाठच्या शेतात पाणी घुसल्याने मढ, दहीद, पाडळी, पळसखेड नागोसह परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतातील उभी पिके या पावसामुळे खरडली आहे. दुसरीकडे पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी बुलडाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी लगोलग सुरू केली. काही ठिकाणी त्यांनी मदत कार्यही केले. सोबतच प्रशासकीय यंत्रणेला या आपत्कालीन परिस्थितीत त्वरेने मदत कार्य करण्याचे त्यांनी सूचित केले. नळकुंडसह मोताळा तालुक्यातील ज्या भागात नुकसान झाले, तेथेही त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आर्थिक मदतीसह अन्नधान्य दिले आहे.

--१८ कुटुंबे स्थलांतरित--

या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने, नदी काठची १८ कुटुंबे स्थलांतरित करावी लागली आहे. या कुटुंबामध्ये जवळपास १०५ व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये मोताळा तालुक्यातील अंत्री येथील १२ कुटुंबे, बुलडाणा तालुक्यातील एक आणि खामगाव तालुक्यातील पाच कुटुंबांचा समावेश आहे. सोबतच बुलडाणा, खामगाव आणि मोताळा तालुक्यातील ३२७ घरांची पडझड झाली असून, त्या जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

--दोघांचा मृत्यू--

या पावसामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या जवळा पळसखेड येथील आदित्य संतोष गवई याचा मृतदेह सापडला असून, त्याचे पार्थिव शेगाव येथील सईबाईमोटे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, नांदुरा तालुक्यातील पातोंडा येथील नितीन गव्हाडे हाही पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेला आहे. त्याचाही शोध सध्या बचाव पथक घेत आहे.

--१,३२५ हेक्टवरील नुकसान--

नुकसानीचा आकडा मोठा असला, तरी प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार १ हजार ३२५ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मका, तूर व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नुकसानाच्या सर्वेक्षणाचे निर्देश देण्याची मागणीही होत आहे.

--सात गुरे ठार--

पावसादरम्यान मासरूळ येथे पांडुरंग तोताराम सावळे यांच्या गायीचा वीज पडून मृत्यू झाला, तर जिल्ह्यात एकूण ७ मोठ्या गुरांचा मृत्यू झाला आहे. नुकसानीसंदर्भातील माहितीही आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल विभाग व कृषी विभाग सध्या संकलित करत आहे.

Web Title: Heavy rains hit the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.