अर्थकारण सावरण्यासाठी दमदार पावसाची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 12:38 PM2021-06-20T12:38:44+5:302021-06-20T12:38:50+5:30
Heavy rains needed to recover the economy : बुलडाणा जिल्ह्याचे जवळपास २४ हजार कोटी रुपयांचे अर्थकारण सावरण्यासाठी आता दमदार पावसाची गरज आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना व गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने फटका दिलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे जवळपास २४ हजार कोटी रुपयांचे अर्थकारण सावरण्यासाठी आता दमदार पावसाची गरज आहे.
जून महिन्याच्या अखेरीसही जिल्ह्यात ९० टक्के खरिपाच्या क्षेत्रावरील पेरण्या रखडलेल्या आहेत. त्यातच हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या विस्तारित अंदाजामध्ये जिल्ह्यात १८ ते २४ जूनदरम्यान सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोबतच २५ जून ते १ जुलैदरम्यानच्या अंदाजामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे ९५ टक्के अर्थकारण कृषीवर अवलंबून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात आगामी काळातील पावसावरच जिल्ह्याची मदार राहणार असल्याचे दिसते.
गेल्या चार ते पाच वर्षांत कोरडा व नंतर ओला दुष्काळ जिल्ह्यात पडला होता. त्यानंतर कोरोनाचे संकट गेल्या १५ महिन्यांपासून घोंगावत आहे. सिंचन सुविधा कमी आणि कोरडवाहू क्षेत्र अधिक असलेल्या बुलडाणा जिल्ह्याची मदार त्यामुळे मान्सूनच्याच पावसावर अवलंबून असते. त्यातच जिल्ह्यातील बँकांकडून करण्यात येणाऱ्या एकूण पतपुरवठ्यापैकी ३४ टक्केच शेतकऱ्यांना पतपुरवठा होतो. अशा स्थितीत या महिनाअखेर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यास कृषी क्षेत्राला बसणाऱ्या फटक्याचे परिणाम हे अन्य क्षेत्रावरही पडू शकतात व त्यातून अर्थकारण आणखी डबघाईस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी दहा दिवस हे कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत.
चार तालुक्यांची स्थिती चांगली
आतापर्यंत पडलेला पाऊस जूनच्या सरासरीच्या चार टक्के कमी असला तरी खामगाव, चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील एखाद दोन महसूल मंडळे वगळता चांगला झाला आहे. मेहकरची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे या भागात पेरण्या होऊ शकतात; परंतु अन्य तालुक्यांत तशी स्थिती नाही. त्यामुळे अन्य तालुक्यात पाऊस कसा पडतो यावर बरेचशे गणित अवलंबून आहे.
पेरणीस विलंब झाला तर परतीच्या पावसाचा फटका?
समाधानकारक पाऊस न पडल्यास पेरणी उशिरा होऊन पिकांचे जीवनचक्रही उशिरा पूर्ण होईल. त्यातच अलीकडील काळातील हवामान बदलामुळे परतीच्या पावसाचा गेली दोन वर्षे कहर पहावयास मिळाला. त्याचाही फटका प्रसंगी या पिकांना नंतर बसू शकतो. त्यामुळेच पेरण्यांसाठी तथा अर्थकारण सावरण्यासाठी आगामी काळात पडणारा पाऊस हा निर्णायक ठरणार आहे. २०१९ मध्ये वार्षिक २२.१९ टक्के परतीचा पाऊस पडला होता. त्यामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. २०२० मध्येही अशीच स्थिती होती.
विस्तारित अंदाजात पाऊस कमी
हवामान विभागाकडून दर गुरुवारी देण्यात येणाऱ्या विस्तारित अंदाजामध्ये १८ ते २४ जूनदरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस सांगण्यात आला आहे. मात्र, २५ ते १ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे पेरणीच्या दृष्टीने या कालावधीतील पाऊस हा निर्णायक ठरणारा राहू शकतो, असे जिल्हा कृषी हवामान विभागाचे तज्ज्ञ मनेष यदुलवार यांनी स्पष्ट केले