मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकीला उसळली प्रचंड गर्दी
By admin | Published: September 12, 2016 01:48 AM2016-09-12T01:48:40+5:302016-09-12T01:48:40+5:30
बुलडाणा जिल्ह्यात तयारीला वेग; मराठा क्रांती मोर्चा ठरणार रेकॉर्ड ब्रेक.
बुलडाणा, दि. ११ : कोपर्डी घटनेचा निषेध तसेच मराठा समाजहिताच्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांच्यावतीने २६ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाची तयारी जिल्हाभर मोठय़ा उत्साहाने केली जात आहे. प्रत्येक तालुका व मोठय़ा शहरांच्या ठिकाणी होणार्या नियोजन बैठकांना समाजबांधवांची स्वयंस्फूर्तीने होणारी गर्दी या मोर्चाच्या यशस्वितेचे संकेत देणारी ठरत आहे. ११ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या सूक्ष्म नियोजनासाठी जिल्हा स्तरावर पार पडलेली बैठकदेखील लक्षवेधी ठरली.
रविवारी शरद कला महाविद्यालयात ही बैठक पार पडली. जिल्ह्यातील मराठा समाजाचे सर्वच पक्षातील आजी, माजी लोकप्रतिनिधी, नेते तसेच सर्वच क्षेत्रातील मातब्बर मंडळी व समाजबांधव या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थतेच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या उपाययोजना, मोर्चाचा मार्ग, तालुका स्तरावर करावयाचे नियोजन, वाहतूक यासह इतर बाबतीत यावेळी चर्चा करण्यात आली. मूक मोर्चा असल्याने कोणतीही नारेबाजी न करता केवळ हाती निषेधाचे काळे झेंडे आणि काही घोषवाक्य लिहिलेले फलक घेत या मोर्चात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मराठा समाजातील शैक्षणिक संस्थाचालकांनी मोर्चाच्या दिवशी आपल्या शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याचा निर्णय यावेळी व्यक्त केला.
या बैठकीत जिल्हाभरातील समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पक्ष, राजकारण, संघटना बाजूला ठेवून केवळ समाजहिताच्या मागण्यांसाठी या मोर्चात सर्वांंनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
महिला आणि युवतींनी मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करीत, हा मोर्चा ऐतिहासिक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कोणत्याही पक्षाच्या, जातीच्या किंवा शासनाच्याही विरोधात हा मोर्चा नाही. त्यामुळे सर्वच पक्षातील मराठा समाजबांधव या मोर्चाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोर्चाच्या नियोजनासाठी बैठका पार पडत असून, या बैठकांना समाजबांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.