अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:35 AM2021-04-01T04:35:19+5:302021-04-01T04:35:19+5:30
राहुल बोंद्रेंची महसूलमंत्र्यांकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले ...
राहुल बोंद्रेंची महसूलमंत्र्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राहुल बोंद्रे यांनी ३१ मार्च रोजी विधानभवनात महसूलमंत्री थोरात यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानीची माहिती दिली. १७ ते २७ मार्च या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे गहू, हरभरा, कांदाबीज, भाजीपाला व फळबागाचेही नुकसान झाले आहे. काही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेडनेटचेही नुकसान झाले आहे. रबी हंगामात अत्यंत मेहनत करून हातातोंडाशी आलेला घास असा अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे नुकसानीचा वरिष्ठ पातळीवरून सर्व्हे करणे व शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी बोंद्रे यांनी महसूलमंत्री थोरात यांच्याकडे केली आहे.
..............................