जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी विदेशातून मदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:05 PM2019-04-12T14:05:13+5:302019-04-12T14:05:48+5:30
खामगाव : येथील ऐतिहासिक जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘लोक’चळवळीला उत्स्फूर्त मदत मिळत असल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील ऐतिहासिक जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘लोक’चळवळीला उत्स्फूर्त मदत मिळत असल्याचे दिसून येते. विदेशातूनही मदतीचा ओघ वाढला असून सामाजिक जाणिवेतून अनिवासी भारतीयांनी खोलीकरणासाठी आतापर्यंत जवळपास ५० हजाराचा निधी एका सामाजिक संस्थेच्या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत रोटरीच्या खात्यात अडीच लाखांची रक्कम जमा झाल्याचे समजते.
खामगाव येथील पुरातन जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यासाठी नगर पालिका प्रशासन, भारतीय जैन संघटना आणि रोटरी क्लबच्या पुढाकारात ‘लोक’चळवळ उभी करण्यात आली. गाळ उपसा मोहिमेसाठी भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी आणि पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. तर केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट संस्थेने १ लाख ११ हजार रूपयांची मदत दिली. त्यापाठोपाठ खामगाव नगर पालिका कर्मचाºयांनी एक दिवसांचे वेतन दिले. तलावाच्या खोलीकरणासाठी एकदिवसाच्या वेतनासाठी पालिका कर्मचाºयांना ऐच्छीक आवाहन करण्यात आले होते. मात्र, मुख्याधिकाºयांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचाºयांनी स्वत:हून एकदिवसाचे वेतन दिले. यामध्ये महिला कर्मचाºयांचा सहभाग उल्लेखनिय असाच आहे. स्थानिक सामाजिक संस्था आणि विदेशी मदत मिळून शुक्रवारपर्यंत रोटरीच्या खात्यात अडीच लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे समजते.
‘तरूणाई’चे श्रमदान!
जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी स्थानिक सामाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू असतानाच, तरूणाई फांउडेशनच्यावतीने श्रमदानातून गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांचीही मदत घेण्यात येईल.
अनिवासी भारतीयांकडून मदतीचा ओघ!
मूळ भारतीय वंशाच्या अनिवासी भारतीयांनी सामाजिक दायित्व म्हणून जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी लंदन येथील निलेश गोकुलदासजी राठी यांनी ११ हजार रुपये, दुबई येथील राजेश बजाज यांनी ११ हजार रूपये आणि आॅस्ट्रेलिया येथील शीतल सातपुतळे यांनी ५००० हजार रुपये दिलेत. त्याचप्रमाणे भोपाळ, अमित कॉटन आणि दिल्ली येथील तिघांजणांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. तर दोन जणांनी प्रत्येकी पाच हजार अशी दहा हजाराची निनावी मदत असे एकुण ५२ हजार आणि नगर पालिका कर्मचारी संघटना व केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असो.ची १ लाख ११ हजाराची मदत मिळून शुक्रवार (१२ एप्रिलरोजी दु. १२ वाजेपर्यंत) रोटरीच्या खात्यात अडीच लाख रूपये जमा झाल्याचे रोटरीचे प्रकल्प व्यवस्थापक देवेश भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी बीजेएस सोसायटी, रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. पालिका प्रशासनाचे या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य असून, पालिका कर्मचाºयांनी एक दिवसाचे वेतन दिले. त्याचप्रमाणे शहरातील इतर सामाजिक संघटनांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. ही खामगाव शहरासाठी आनंददायी बाब आहे.
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.
जनुना तलाव हे खामगावचे वैभव आहे. जलसंवर्धनासाठी पाणी फांउडेशनच्या उपक्रमात ‘तरुणाई’सहभागी आहे. जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी श्रमदानासाठी तरूणाईचा पुढाकार राहणार आहे.
- उमाकांत कांडेकर, सहसचिव तरुणाई फाऊडेशन, खामगाव.