मृत शिक्षकांच्या कुटुंबाला दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:49+5:302021-05-28T04:25:49+5:30

मेहकर : क्षमता आणि लायकी असूनही मर्यादित उत्पन्न स्रोत असल्यामुळे ‘काटकसरी’ हा समाजाचा शिक्का बसलेल्या शिक्षकांचे दातृत्व अनेक ...

A helping hand to the family of the deceased teacher | मृत शिक्षकांच्या कुटुंबाला दिला मदतीचा हात

मृत शिक्षकांच्या कुटुंबाला दिला मदतीचा हात

Next

मेहकर : क्षमता आणि लायकी असूनही मर्यादित उत्पन्न स्रोत असल्यामुळे ‘काटकसरी’ हा समाजाचा शिक्का बसलेल्या शिक्षकांचे दातृत्व अनेक प्रसंगात सिद्ध झाले आहे. त्याची प्रचिती मेहकर तालुक्यातील शिक्षक देत असून प्रत्येक मृत शिक्षकांच्या कुटुंबांना लाखाची मदत स्वतः वर्गणीतून उभारलेल्या निधीमधून ते देत आहेत.

मेहकर तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची संख्या ७०० च्या जवळपास आहे़ तालुक्यातील कार्यरत शिक्षक कोणत्याही कारणाने मृत्युमुखी झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सर्वांच्या वर्गणीतून साधारणतः एक लाखाची मदत करण्यात येते. हा उपक्रम मागील दहा वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. त्यामध्ये एकमेकांच्या प्रती असणारी संवेदनशीलता कृतीतून व्यक्त होत असल्यामुळे मनभेद नसल्याचे अधोरेखित होते.

सध्याच्या महामारीमुळे मृतांची संख्या वाढली असली तरी उपक्रमांमध्ये मात्र खंड पडला नाही. किमान रुपये शंभर ते कमाल हजारो रुपये देणारे अनेक शिक्षक स्वेच्छेने आपला सहभाग नोंदवतात. शिक्षकांच्या मृत्यूनंतर दहा दिवसाच्या आत केंद्रनिहाय सर्व निधी संकलित करण्यात येतो. जमा झालेल्या सर्व निधीचा एकत्रित धनादेश मृत कुटुंबाच्या स्वाधीन केला जातो. यावर्षी अशा पाच दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहे. अलीकडेच आंधरूड येथील पंडितराव देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ७१ हजारांचा निधी त्यांच्या धर्मपत्नी मायाताई देशमुख, मुलगा चंद्रशेखर देशमुख, मुलगी शुभांगी देशमुख आणि भाऊ कल्याणराव देशमुख, मदनराव देशमुख यांच्या सुपूर्द करण्यात आला.

या उपक्रमासाठी मेहकर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती,महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख सभा, मुख्याध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना या संघटनांच्या पदाधिकारी आणि प्राथमिक शिक्षकांचा सक्रिय सहभाग आहे.

Web Title: A helping hand to the family of the deceased teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.